Premium

भाजपचे दबावतंत्र? कल्याणवरही दावा, फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा ‘संकल्प’ 

आगामी लोकसभा निवडणुकीत ४८पैकी किमान ३४-३५ जागा लढविण्याचा मानस असल्याचे भाजपमधील उच्चपदस्थांकडून सांगण्यात येत आहे.

pressure tactics by bjp to make devendra fadnavis cm of maharashtra
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई / नागपूर / कल्याण : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मिळविलेल्या मोठय़ा विजयानंतर महाराष्ट्रातही भाजपचे दबावतंत्र सुरू झाले आहे. लोकसभेच्या अधिकच्या जागांसाठी राज्यातील नेत्यांनी आग्रह धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या स्थानिक आमदाराने पुन्हा दावा ठोकला. तर आगामी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव वदवून घेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीचे स्थळही जाहीर करून टाकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा निवडणुकीत ४८पैकी किमान ३४-३५ जागा लढविण्याचा मानस असल्याचे भाजपमधील उच्चपदस्थांकडून सांगण्यात येत आहे. उर्वरित जागा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना दिल्या जातील, असे सांगितले जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये २५-२३ असे जागावाटप झाले होते.  नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा  पंतप्रधान व्हावेत यासाठी महाराष्ट्रात ४५ हून जागांवर विजयाचे ध्येय भाजपने ठेवले असून त्यासाठी अधिकाधिक जागा लढविण्याचे पक्षाच्या मनात आहे. सध्या शिंदे गटाकडे १३ खासदार असून अजित पवार गटाने बारामती, शिरूर, सातारा व रायगड या चार जागांवर दावा केला आहे. मात्र एवढय़ा जागा मित्रपक्षांना देण्याची शक्यता नसल्याचे उच्चपदस्थ भाजप नेत्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

हेही वाचा >>> “लोकसभेला कल्याणमध्ये भाजपाचा उमेदवार निवडून येईल”, गणपत गायकवाडांच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले…

 कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटातील कलगीतुरा पुन्हा सुरू झाला आहे. कल्याण पुर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे. याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. उमेदवारीबाबत अंतिम निर्णय शिवसेना-भाजपचे वरिष्ठ घेतील असे उत्तर दिले.

सर्वेक्षणाच्या आधारेच उमेदवारी?

भाजपने राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमार्फत सर्वेक्षण केले आहे. त्यातील एक अहवाल आला असून डिसेंबर अखेरीस पुढील अहवाल अपेक्षित आहे. त्यानंतर महायुतीतील जागावाटप अंतिम केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिंकलेल्या जागा त्या-त्या पक्षांकडे राहतील असे सूत्र असले, तरी यावेळी धोका पत्करण्याची भाजपची तयारी नाही. राजकीय परिस्थितीचा विचार सर्वेक्षण अहवालाच्या आधारे केला जाईल व विजयाची खात्री असलेल्या नेत्यालाच उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘पुढचा मुख्यमंत्री कोण? फडणवीस..!’

 भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संकल्प केले. ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होईल. त्यानंतर नव्या सरकारसाठी पुन्हा एकदा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होईल, असे सांगून बावनकुळे काही क्षण थांबले आणि ‘‘यापूर्वी वानखेडेवर कोणाचा शपथविधी झाला? आता तुमच्या मनात काय आहे?’’ अशी विचारणा कार्यकर्त्यांना केली. कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत एकासुरात फडणवीस यांचे नाव घेतले. त्यानंतरही बावनकुळेंनी कार्यकर्त्यांकडून अनेकदा याची ‘उजळणी’ करून घेतली.

कल्याण आणि भिवंडी हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले आहेत. यासह ठाण्यावरही भाजप दावा करेल. ठाणे जिल्ह्यातील आगामी खासदार भाजपचे असतील. – गणपत गायकवाड, आमदार, भाजप

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pressure tactics by bjp to make devendra fadnavis cm of maharashtra zws

First published on: 05-12-2023 at 04:29 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा