नीरज राऊत/ हेमेंद्र पाटील

स्फोट झालेल्या कारखान्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी; घातक व ज्वलनशील पदार्थाचा साठा

पालघर/ बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील स्फोट झालेल्या एनके फार्मा या कंपनीत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतल्या गेलेल्या उत्पादन करण्याच्या परवानगीव्यतिरिक्त अन्य रासायनिक पदार्थाचे उत्पादन सुरू होते, असा प्राथमिक निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला आहे. नियमबाह्य घातक व ज्वलनशील पदार्थाचा साठा केल्याचेही उघडकीस आले आहे. तसेच उत्पादन करण्याची परवानगी देण्यापूर्वी तसेच परवाना दिल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोणत्याही जबाबदार व्यक्तीने या कारखान्याला भेट दिली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या कंपनीने १.०५ घनलिटर प्रतिदिन सांडपाणी निर्मिती करण्याच्या रासायनिक प्रक्रियेसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितली होती. मात्र २०१८-१९मध्ये तारापूर येथील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडून उद्योगांना नवीन जोडणी देण्याची क्षमता नसल्याने या कंपनीला परवानगी देण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी प्रस्ताव नाकारला होता. त्यानंतर या उद्योजकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात याबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान रासायनिक उत्पादनासाठी आवश्यकती प्रदूषण नियंत्रण व्यवस्था कंपनीच्या आवारात उभारणी करू तसेच कंपनीमधून एकही थेंब सांडपाणी बाहेर जाऊ  देणार नाही (झिरो डिस्चार्ज युनिट) या पद्धतीने व्यवस्था उभारण्याचे आश्वासन दिल्यानंतर २ जानेवारी २०२० रोजी या कंपनीला उत्पादन करण्याचा परवाना देण्यात आला होता.

विशेष म्हणजे परवानगी देण्यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी (फील्ड ऑफिसर) १० ऑक्टोबर २०१९ रोजी या कंपनीला भेट दिली असता कंपनीच्या प्रवेशद्वारजवळ उभारण्यात आलेल्या इमारतीचा वापर कार्यालयीन कामकाजासाठी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात अपघात झाल्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया करण्यात येण्यासाठी रिअ‍ॅक्टर, थरमोपॅक, सेंट्रिफ्यूज इत्यादी सामग्री सुरक्षा विभागाच्या परवानगीशिवाय उभारण्यात आल्याचे आढळून आले. म्हणजेच या ठिकाणी झिरो डिस्चार्ज युनिट अर्थात सांडपाणी निर्मिती होणार नाही याची स्थळपाहणी झाल्याशिवाय परवानगी देण्यात आल्याचे तसेच परवानगी दिल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली गेले नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अपघातग्रस्त कंपनीने मुख्यालयातून उत्पादन परवानगी प्राप्त केल्याचे सांगण्यात आले.

कंपनीकडून अटी-शर्तीचा भंग

  •  या उद्योजकाच्या अन्य एका ठिकाणी असलेल्या ‘एलेकसो केमिकल’ नामक कंपनीमध्ये उत्पादित होणाऱ्या घातक व स्फोटक प्रवृत्तीचे रसायन अपघातग्रस्त ठिकाणी तयार करण्यात येत असल्याची शक्यता प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कंपनीला दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आली आहे.
  •  अपघातग्रस्त ठिकाणी ऑर्थो क्लोरो टॉल्व्हिन, झायलीडीन, ट्रान्स-अमायनो सायक्लो हॅक्सेनॉल असे चीनमधून आयात केलेल्या रसायनांचा साठा आढळला आहे.
  •  डायमिथाइल फोरमाइड व झायलीडीन यांसारख्या घातक रसायनांचा साठा अपघातस्थळी आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.
  •  या रसायनांपैकी काही रसायनांचा वापर परवानाप्राप्त रासायनिक उत्पादनासाठी होत असल्याचा प्राथमिक अंदाज प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केला असून यामुळे या विभागातर्फे परवाना देताना घालण्यात आलेल्या अटी-शर्तीचा भंग झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीमध्ये दिसून आले आहे.

चार दिवसांनंतरही गुन्हा दाखल नाही

बोईसर : तारापूरमधील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाला चार दिवस उलटल्यानंतरही दोषींवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. औद्योगिक सुरक्षा विभागाने गुन्हे दाखल करण्यासाठी अद्याप पोलीस ठाण्यात अहवाल दिलेला नसल्याचे समोर आले आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाच्या संचालकांना स्फोटाबाबत दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी पत्र देणे बंधनकारक आहे. मात्र अद्याप असे पत्र देण्यात आलेले नाही. पोलिसांनी स्फोटाबाबत गुन्हा दाखल केला आहे का याबाबत बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर जगताप यांना संपर्क साधला असता त्यांनी अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगत कारखाने सुरक्षा विभागाचे पत्र आले आहे का ते माहीत नसल्याचे सांगितले.

मृतांच्या कुटुंबीयांना शासनाची मदत

तारापूरमधील स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना अखेर शासनाकडून मदत देण्यात आली आहे. कारखान्यात स्फोट झाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली होती. मात्र चार दिवस उलटल्यानंतरही मदतीचे वाटप करण्यात आले नव्हते. १३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री कार्यालयातून महसूल विभागाला पत्र देण्यात आले. अखेर बुधवारी दुपारी मदतीचे तातडीने वाटप करण्यात आले. तारापूरमधील कारखान्यात स्फोट होऊन आठ जण ठार झाले.