पिंपरी चिंचवडच्या देहूरोड हद्दीतील मामुर्डी येथे लोकनाट्यात नाचण्यावरून दोन गटात हाणामारी झाली . सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मामुर्डी येथील भैरवनाथ मंदिराच्या समोर ही घटना घडली. याप्रकरणी देहूरोड पोलिसात फिर्याद देण्यात आली असून राजा राऊत,गोटू राऊत यांच्यासह १६ जणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही, देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामुर्डी गावात दोन दिवसांपासून भैरवनाथाच्या यात्रेचा जल्लोष आहे. याच निमित्ताने लोकनाट्याचे (तमाशा) आयोजन करण्यात आले होते. रात्री लोकनाट्य सुरू झाले. प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती. अनेकांनी लावणीच्या संगीतावर ठेका धरला होता. फिर्यादी प्रमोद गायकवाड आणि त्यांचे मित्र मंडळी होते, त्याचबरोबर राजा राऊत,गोटू राऊत त्यांचे मित्र देखील या लावणीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. फिर्यादी गायकवाडचे मित्र नाचत असताना संशयित आरोपी राजा राऊत आणि गोटू राऊत यांच्या मित्रांमध्ये नाचण्यावरून धक्काबुक्की झाली, त्यानंतर त्याचे पर्यावसन दोन गटातील हाणामारीत झाले. यात फिर्यादी आणि राऊत यांच्या गटात तुफान हाणामारी झाली. त्यानुसार प्रमोद गायकवाड यांनी १६ जणांविरोधात देहूरोड पोलिसात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.