शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाचार घेतला असून, अगोदर या दळभद्री सरकारमधून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा, अशा शब्दांत सुनावले आहे.

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा फैजपूर येथे प्रारंभ करताना ते बोलत होते. विखे पाटील यांनी यावेळी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर बोलताना ते म्हणाले की, ‘शिवसेनेने आजवर २३५ वेळा सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले. पण शेवटपर्यंत सत्ता सोडली नाही. हे सरकार लोकविरोधी आहे, शेतकरी विरोधी असे वाटत असेल तर शिवसेनेने तात्काळ या सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान विरोधी पक्षनेत्यांनी उद्धव ठाकरेंना दिले’.

दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंचा आवाज अयोध्येत घुमणार

‘हे सरकार गांधीजींचे नाव घेते. पण प्रत्यक्षात त्यांनी गांधीजींच्या विचारांना हरताळ फासण्याचे काम केले आहे. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेची द्विसुत्री दिली. पण हे सरकार खरे कधी बोलत नाही आणि खोटे बोलण्यात यांचा हात कोणी धरू शकत नाही. १०० गोबेल्स मेले असतील, तेव्हा भारतीय जनता पक्ष जन्माला आला असेल, अशी बोचरी टीकाही विखे पाटील यांनी यावेळी केली.

‘राम मंदिर करून दाखवण्यासाठी हवी शिवसेना’

गांधीजींच्या आत्मचरित्राचे नाव ‘माझे सत्याचे प्रयोग’ आहे. मात्र गांधीजींचे नाव घेणारे हे सरकार सारे असत्याचेच प्रयोग करते आहे. मोदी स्वतःला चौकीदार म्हणवून घेतात. पण हे ‘जागते रहो’ म्हणण्याऐवजी ‘भागते रहो’म्हणणारे चौकीदार आहे. म्हणूनच विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहूल चोक्सी पळाले. आता नितीन संदेसरा नावाचा आणखी एक ‘महापुरूष’ ५ हजार ७०० कोटी रूपयांचा घोटाळा करून पळून गेला. पण पंतप्रधान एक शब्द बोलायला तयार नाहीत. या सरकारकडे जनतेच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाही अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.