दोन दिवस झोडपून काढणा-या पावसाने गुरुवारी उसंत घेतली. पावसाने उघडीप दिली असली तरी आठवडाभरात झालेल्या धुवाधार पावसामुळे पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा अशा सर्वच प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. तर ८९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. २८ मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात एकूण ५२ घरांची पडझड झाली आहे. कृष्णा नदीकाठच्या सव्वाशेहून अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामीण भागात पुराचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेची आपत्ती निवारण यंत्रणा गतिमान झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रसह शिरोळ तालुक्यात बुधवारी दिवसभर झालेल्या दमदार पावसामुळे कृष्णेच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ झाली आहे. नृसिंहवाडीच्या श्रीदत्त मंदिरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. काल दक्षिणद्वार सोहळा झाल्याने भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. आज मंदिराचा बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे. संगम घाटावर नृसिंहवाडी येथे कृष्णेची पातळी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. दत्तमंदिरात कृष्णा नदीचे पाणी आल्याने श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी श्री नारायणस्वामी महाराज यांच्या मठात ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १४३.६५ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १ जूनपासून आजअखेर सरासरी ६८१.७८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
दोन दिवस झालेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यात घरांची पडझड झाल्याचे वृत्त मोठय़ा प्रमाणात हाती आले आहे. तालुकानिहाय आकडेवारी याप्रमाणे- शाहुवाडी १९, भुदरगड १०,चंदगड १३, कागल २, करवीर ३, आजरा ५, घरांची पडझड होऊन सुमारे १५ लाख ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत असून नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगा नदीची पातळी ३७.९ फुटांवर असून, तिची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदी काठावरील १२९ गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, राधानगरी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरण ७८ टक्के भरले आहे.