सोलापूर : लोकसभा निवडणुकीत रिपाइंला सोलापूर व शिर्डी या दोन जागा द्याव्यात अशी आग्रही मागणी केंद्रीय सामाजिक न्या राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या दोन्ही जागा मिळाल्यास शिर्डीतून आपण स्वतः आणि सोलापुरातून राजा सरवदे हे निवडणूक लढवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी आठवले सोलापुरात होते. त्यावेळी एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महायुतीमध्ये आपल्या रिपाइं पक्षाचे अस्तित्व असूनही त्याचा विसर पडत चालल्याबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले, राज्यात महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीनच पक्षांचा कायम उल्लेख होतो. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सुद्धा महायुतीमध्ये आहे. आम्हाला विसरून चालणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला सोलापूर आणि शिर्डी या दोन जागा मिळाल्याच पाहिजे, अशी मागणी आठवले यांनी केली. या दोन्ही जागा भाजपच्या कमळ चिन्हावर नव्हे, तर आपल्या पक्षाच्या चिन्हावरच लढविण्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखविला.

आणखी वाचा-करमाळ्यातील बागल गट शिवसेना शिंदे गट सोडून थेट भाजपमध्ये

यावेळी आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला मिळालेल्या तुतारी चिन्हासह प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची स्वरचित चारोळीतून खिल्ली उडविली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह मिळाल्याचा संदर्भ देत त्यावर चारोळी करताना आठवले म्हणाले-
शरद पवारांना मिळाली तुतारी,
बघूया गावागावात किती ऐकणार आहेत म्हातारी..

नंतर शरद पवार यांच्याविषयी आठवले यांनी आदरही व्यक्त केला. पवार यांना त्यांचा पक्ष आणि बहुसंख्य आमदार सांभाळता आले नाहीत. उलट, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जायला हवे होते. यापूर्वी त्यांनी १९७८ साली राज्यात पुलोद मंत्रिमंडळ बनविताना तत्कालीन जनसंघाला म्हणजेच सध्याच्या भाजपला सोबत घेतले होते, याचा दाखलाही आठवले यांनी दिला.

आणखी वाचा-मनोज जरांगेंच्या गंभीर आरोपांबाबत विचारताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरे मी …”

महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सामावून घेण्यावरून फारच गोंधळ सुरू आहे. त्यासंदर्भात आठवले यांनी चारोळीसादर केली.
वंचित आघाडीचे तळ्यात की मळ्यात,
बघूया आता जातात कुणाच्या गळ्यात..

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale insists for both solapur and shirdi lok sabha seats mrj