मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. मला सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच एन्काऊंटर करून मला मारून टाकण्याचा फडणवीसांचा विचार आहे, असे जरांगे म्हणालेत. या आरोपांनंतर जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. फडणवीसांच्या सागर या बंगल्यासमोर जरांगे आंदोलन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“…किंवा माझा तिथेच मृत्यू होईल

जरांगे यांच्या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. जरांगे हे आता मुंबईकडे निघाले असून ते फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर आंदोलन करण्याची शक्यता आहे. एक तर मी मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण घेऊन येईल किंवा माझा तिथेच मृत्यू होईल, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. जरांगे यांच्या या भूमिकेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केलीय. जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हायला हवी, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत.

“अरे जरांगे काय बोलले…”

भाजपाने मात्र जरांगे यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना जरागेंच्या आरोपांबाबत पत्रकारांनी बोलतं करण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांनी मात्र यावर थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले. त्यांनी पत्रकारांनी संवाद साधताना ‘अरे जरांगे काय बोलले मी काही ऐकलंच नाही’, असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, जरांगेंच्या आरोपांवर फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका

भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी मात्र जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे. जरांगे यांनी आपली नौटंकी बंद करावी, असे प्रसाद लाड म्हणाले. “मी जरांगे पटलांची पत्रकार परिषद पाहिली. त्यांनी त्यांची नौटंकी बंद करावी. मराठा समाजाच्या नावाखाली गेल्या सात-आठ महिन्यांत जरांगे पाटील राजकीय वरदहस्त मिळवण्याचा प्रयत्न करत होते. जरांगे पाटील यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे, हे त्यांनी सांगावे. जरांगे पाटील यांच्यामागे सिल्व्हर ओक आहे की जालन्यातील भय्या फॅमिली आहे, हेही त्यांनी सांगावे. लोकांसमोर आता खरं खरं यायला लागलं आहे,” अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.

“लेकरू-लेकरू करून ढेकर देणं बंद करा”

“मी दहावेळा सांगितलं होतं की तुम्ही फडणवीसांचे नाव घेऊ नका. फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहे. फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. याच फडणवीसांचं नाव तुम्हाल कोण घ्यायला लावत आहे हे आज जनतेसमोर आलं आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळी संपली हे जरांगे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतून समोर येत आहे. त्यामुळे समाजाच्या नावाखाली लेकरू-लेकरू करून ढेकर देणं बंद करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. मराठा समाज खुश आहे,” असेही प्रसाद लाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis first comment on manoj jarange patil allegations of encounter prd