उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची अवस्था विझत आलेल्या दिव्यासारखी झाली आहे. त्यामुळेच हे दोघंही वाट्टेल ते बोलत आहेत. उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी झाली पाहिजे म्हणजे सगळा भ्रष्टाचार बाहेर येईल अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि एकेकाळचे उद्धव ठाकरेंचे विश्वासू रामदास कदम यांनी केली आहे. भ्रष्टाचारी कोण आहे हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले रामदास कदम?

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसह काम करण्याची संधी मला मला मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. पण आत्ता जे महाराष्ट्रात बाप-बेटे दोघेजण बडबड करत आहेत. उद्धव ठाकरे आणि त्याचं पिल्लू, यांचं बोलणं, वागणं आणि टोमणे हे पाहिले तर एखादा दिवा विझताना जसा फडफडतो तशी फडफड या दोघांची सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांचं कलम ३७० हटवण्याचं आणि राम मंदिराचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं. तरीही पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातच बोलण्याचं काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करत आहेत.”

उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज

“अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी महाराष्ट्राचा नालायक मुख्यमंत्री कोण ठरलं असेल तर हा माणूस. (उद्धव ठाकरे) ४० पैकी एकाही आमदाराने ५० खोके घेतल्याचं उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन असं आव्हानच मी करतो आहे. आम्हाला फक्त बदनाम करण्यासाठी हे केलं जातं आहे. आपल्याकडून मुख्यमंत्रिपद का गेलं? पद का सोडावं लागलं? ४० आमदार, १० अपक्ष आमदार १३ खासदार हे सगळे का निघून गेले याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी ज्या ज्या नेत्यांना घडवलं त्यांना संपवण्याची सुपारीच उद्धव ठाकरेंनी घेतली आहे.” असाही आरोप रामदास कदम यांनी केला.

हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीस नाही तर ‘फोडणवीस’, हे घरफोडे आता..”; उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी

उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी झाली पाहिजे

“आम्ही पुष्कळ मिठाईचे खोके दिले होते. मात्र तिथे धबधबा सुरु रहावा लागतो. पुढच्या दहा दिवसांत उद्धव ठाकरेंबरोबर असलेले आमदार एकनाथ शिंदेंना साथ देतील. उद्धव ठाकरेंना फक्त टोमणे मारता येतात. मी एकनाथ शिंदेंकडे मागणी केली आहे की उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळणार आहे की भ्रष्टाचारी कोण आहे. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत आणि त्याच अनुषंगाने काम करत आहोत” असंही रामदास कदम म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam demands ed inquiry of uddhav thackeray rno scj
First published on: 17-02-2024 at 09:08 IST