शिंदे समर्थक रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ तीनदाच मंत्रालयात आले. त्यामुळे त्यांची अगदी गिनीज बुकमध्ये नोंद झाली, असा टोला त्यांनी लगावला आहे.

रामदास कदम म्हणाले, “स्वत:साठी जगला तो मेला, दुसऱ्यांसाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला. असं काम मुख्यमंत्री शिंदे यांचं सुरू आहे. तातडीने निर्णय घेतले जात आहेत. दिवसरात्रं काम करत आहेत, मंत्रालयात लोकाना भेटत आहेत. त्यांच्या निवासस्थानीदेखील नागरिकांना भेटत आहेत.”

तसेच, “या अगोदरचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ तीनदा मंत्रालयात आले होते. अगदी गिनीज बुकात त्यांची नोंद झाली. मुख्यमंत्री कसा असावा, त्यांचा कामाचा सपाटा कसा असावा? हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेहीजण अनुभवी आहेत.” असंही यावेळी कदम यांनी बोलून दाखवलं.

शिवसेना नेतेपदाचा राजीमाना देऊन रामदास कदम शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्या अगोदर त्यांच्यावर कठोर कारवाई करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मागील बऱ्याच काळापासून रामदास कदम हे शिवसेना नेतृत्वावर नाराज होते. वेळोवेळी त्यांनी जाहीरपणे याबाबत बोलूनही दाखवलं होतं. पत्रकारपरिषदेतून आपलं दु:ख देखील त्यांनी मांडलं होतं. अखेर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कदम यांनी देखील शिवसेनेच्या नेते पदाचा राजीनामा दिला व ते शिंदे गटात गेले.