सोलापूर : दुर्मीळ माळढोक पक्ष्यासाठी प्रसिध्द असलेल्या सोलापूरजवळील नान्नज माळढोक अभयारण्यात तीन वर्षानंतर  माळढोक पक्ष्याचे दर्शन घडले. पंधरा वर्षांपूर्वी माळढोक पक्षी नियमित आढळायचे. परंतु अलिकडे या पक्ष्याचे अस्तित्वच धोक्यात आले असून तीन-चार वर्षांनी कधी तरी एकदा माळढोक पाहायला मिळतो.

बुध्द पौर्णिमेचे औचित्य साधून दरवर्षी वन खात्यातर्फे इतर पर्यावरण संस्थांच्या मदतीने प्राण्यांची प्रगणना केली जाते. यंदाच्या प्राणी प्रगणनेच्यावेळी अतिदुर्मीळ माळढोक पक्ष्याच्या दर्शनासाठी सर्वांना उत्सुकता लागली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील माळढोक पक्ष्याच्या अस्तित्वाची नोंद असलेले सोलापूर आणि विदर्भ ही दोनच ठिकाणे सर्वश्रूत आहेत. मात्र मागील दहा-पंधरा वर्षांपासून कधी तरी एखाद दुसरा माळढोक आढळून आल्याच्या नोंदी आहेत. सोलापूरच्या नान्नज माळढोक अभयारण्यात तर माळढोकच्या अस्तित्वाविषयी नेहमीच शंका घेतली जाते. तीन वर्षापूर्वी माळढोकचे दर्शन घडले होते. त्यानंतर बुध्द पौर्णिमेला प्राण्यांच्या प्रगणनेच्यावेळी ऐटदार माळढोक मादीच्या दर्शनाने समस्त वन्यप्रेमींच्या चेह-यांवर समाधानाची रेषा उमटली.

हेही वाचा >>> फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; दोघेजण गंभीर, धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील प्रकार

नान्नज, गंगेवाडी भागात माळढोक अभयारण्य परिसरात २४ ठिकाणी माळरान आणि पाणवठ्यावर लपणगृह, मचाण आणि निरीक्षणगृहातून ३० वन अधिकारी, कर्मचारी आणि ९ पर्यावरणप्रेमी अशासकीय संस्थांच्या कार्यकर्त्यांनी  स्वयंचलित कॕमे-यां प्राणी-पक्ष्यांची हालचाली टिपल्या. यातून आढळून आलेल्या वन्य प्राणी-पक्ष्यांच्या प्राथमिक नोंदी पुढे आल्या. यात एका माळढोक मादीसह ८ लांडगे, १३ खोकड, ५ मुंगूस, ६१ मोर, ३६२ काळवीट, २४९ रानडुक्कर, ४ कोल्हे, एक सायाळ, ६ रानमांजर, २ घोरपड, ६ नीलगाय असे १३ प्रकारचे वन्यजीव आढळून आले. या उपक्रमासाठी पुण्याच्या वन्यजीव उपवनसंरक्षक तुषार चव्हाण व उपविभागीय वनाधिकारी स्नेहल पाटील, वन्यजीव सहायक वनसंरक्षक किशोरकुमार येळे यांच्या मार्गदर्शनाखाली नान्नजच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी जावळे, वनपाल जी. डी. दाभाडे, संतोष मुंढे, नवरक्षक अशोक फडतरे, डॉ. सुजित नरवडे, जीआयबी फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज चिंदरकर आदींनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

हेही वाचा >>> Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, कंपनीच्या मालक मालती मेहता यांना अटक

माळढोक कृत्रिम प्रजनन केंद्र कागदावरच

बाॕम्बे नॕचरल हिस्ट्री सोसायटीचे राज्यातील संकटग्रस्त ४५ प्रजातींच्या पक्ष्यांच्या जाहीर केलेल्या यादीत अतिदुर्मीळ माळढोक पक्ष्याचा समावेश आहे. नान्नज माळढोक अभयारण्यात तीन-चार वर्षांत कधी तरी एकदा माळढोकचे ऐटबाज दर्शन होते. नामशेष होत चाललेल्या माळढोकला वाचविण्यासाठी कृत्रिम प्रजनन हाच पर्याय राहिला आहे. त्यादृष्टीने राजस्थानच्या धर्तीवर इंदापूरनजीक कवंढाळी येथे वनखात्याच्या शंभर हेक्टर क्षेत्रात माळढोक कृत्रिम प्रजजन केंद्र उभारण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा होत आहे. यात राजकीय इच्छाशक्ती आणि पर्यावरणप्रेमी सस्थांचा रेटा वाढण्याची गरज बनली आहे. सध्या तरी हे केंद्र कागदावरच आहे.