वर्धा : फसवणूकीच्या प्रकरणात सहकारी असलेल्याचा सुनियोजीत खून केल्या प्रकरणी राजकीय नेते भास्कर ईथापे यास अटक करण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. अत्यंत थंड डोक्याने रचलेला हा कट पाहून पोलीसही अवाक झाले आहेत.

वर्धा शहराचे नगराध्यक्ष पद पाच वर्ष कुटूंबात राहल्यानंतर पूढे जिल्हा परिषद व विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या भास्कर ईथापे व कुटुंबाचा शहरातील राजकीय व सांस्कृतीक वर्तुळात चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळे हे हत्याकांड शहराला चांगलाचा धक्का देणारे ठरत आहे. पूलगाव येथील शेतीच्या प्रकरणात आरोपी सहकारी राहलेल्या वसंत चोखोबाजी हातमोडे याचा खून केल्याप्रकरणी भास्कर ईथापे (५९), विलास मून (५५) व दिलीप नारायण लोखंडे (६१) यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर आज न्यायालयाने या तीनही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे.

याप्रकरणी २०१७ मध्ये पूलगाव पोलीसांकडे चौघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. येथील शेत बनावट पध्दतीने वसंत हातमोडे याच्या नावावर करण्यात आले. शेत समृद्धी महामार्गात गेल्याने त्याचा मोठा मोबदला हातमोडे यांच्या खात्यात जमा झाला. मात्र खऱ्या वारसदाराने या चौघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याची सूनावणी नुकतीच ७ ऑक्टोंबरला झाली. याच प्रकरणातील पैशाची देवाणघेवाण वादाची ठरली होती. तसेच पोलीसांच्या सांगण्यानूसार आरोपी ईथापे हा हातमोडेकडे अपहार करण्यात आलेल्या रकमेची वारंवार मागणी करीत होता. दुसरी बाब म्हणजे हातमोडेची साक्ष अडचणीत आणण्याची भिती ईथापेला होती, असेही म्हटल्या जाते. याच उद्देशाने हातमोडे यांच्या खूनाचा कट रचण्यात आला.

मात्र एका मच्छीमाराच्या सतर्कतेने हा बनाव चव्हाट्यावर आला. ईथापेच्या शेतालगत रोठा तलावाच्या गेज चेंबरच्या विहिरीत आरोपीने सिमेंटच्या खांबाला बांधून हातमोडेचा मृतदेह सोडून दिला होता. पाच दिवस झाल्याने सुरू झालेल्या दुर्गंधीचा वास मच्छीमारास आला. त्याने पोलीसांना माहिती दिल्यावर खून झाल्याचे समोर आले. सिमेंटचा खांब आरोपी ईथापेच्या शेतातील होता. या संदर्भात विविध पूरावे उपलब्ध असल्याचे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी नमूद केले. अपर पोलीस अधिक्षक यशवंत सोळंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप तसेच महेंद्र इंगळे, सौरभ धरडे व सायबर शाखेने अत्यंत हुशारीने रचलेल्या या हत्याकांडाची उकल केली.