महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज ( बुधवारी) नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभेपूर्वी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे पुढे आलं आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. यावरून शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले रोहित पवार?

पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येणार आहेत म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस दिली जात आहे. काहींना तर अटकही करण्यात आली आहे. खरं तर निर्विवाद सत्ता उपभोगणाऱ्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले असते, तर कदाचित ही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी कांद्याची माळ घालून पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करावे, असं आव्हानही दिले.

पुढे बोलताना, राज्यातील नेते फुसका बार आहेत, तर पंतप्रधान मोदी यांची कांद्याच्या प्रश्नापासून दूर पळण्याची इच्छा आहे. मात्र, महाराष्ट्रातील उध्वस्त झालेला शेतकरी बघून पंतप्रधान मोदी यांचा टेलेप्रोम्प्टर तरी कांद्याबद्दल एखादा शब्द बोलेल ही अपेक्षा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

विशेष म्हणजे देशात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे. जवळपास पाच महिने लागू असणारी कांदा निर्यात बंदी काही दिवसांपूर्वी सशर्त शिथील करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कांदा निर्यात बंदीमुळे झालेले नुकसान हा कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सभेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक ग्रामीण आणि शहर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. सभास्थळी काळे कपडे परिधान करून वा कांदा घेऊन कुणी प्रवेश करणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांचा दावा, “लोकसभा निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे भाजपात प्रवेश करतील”

दरम्यान, मंगळवारी महाविकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी ‘कांद्याने केला वांदा, चला मोदींना जाब विचारुया‘ असा संदेश समाजमाध्यमांत प्रसारित केल्याने कार्यकर्त्यांची धरपकड करीत त्यांना नजरकैदेत ठेवल्याचे सांगितले जातं आहे. शेतकरी संघटनांकडून आंदोलनाची शक्यता लक्षात घेत कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांसह अनेकांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात आपण आंदोलन करू नये. आपल्या हस्तकामार्फत आंदोलन झाल्यास तुम्हाला सर्वस्वी जबाबदार धरले जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.