महाराष्ट्र शिखर बँकेशी निगडीत कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना नोटीस बजावली आहे. २४ जानेवारीला ईडी कार्यालयात रोहित पवारांना उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी हे घाणेरडं राजकारण समजण्यापलीकडे आहे. तरीही, सगळेजण खंबीरपणे माझ्याबरोबर आहेत, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. ‘एक्स’ अकाउंटवर रोहित पवारांनी ट्वीट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित पवार म्हणाले, “ईडी कार्यालयात उद्या (बुधवार दि. २४ जानेवारी) चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र, सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत ईडीने काही चुकीची कारवाई केली, तर कुणीही घाबरून जाऊ नये.”

“महाराष्ट्र धर्म जपायचाय”

“उलट शरद पवारांबरोबर आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर सर्वांनी एकजुटीने उभं रहावं. कारण, आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय!,” असं रोहित पवारांनी म्हटलं.

“महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर…”

“माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण न समजण्याच्या पलीकडचं आहे. पण, तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवारही बरोबर येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय!,” असंही रोहित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar on ed inquairy say support sharad pawar ssa
First published on: 23-01-2024 at 13:59 IST