लोकसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंच्या फोटोसमोर दंडवत घालून पक्षाला जय महाराष्ट्र करणारे वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीत गेले. मात्र अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी हा पक्ष सोडला. वसंत मोरे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मी माझ्या पूर्वीच्याच पक्षात जात आहे असं त्यांनी म्हटलं होतं. हातावर शिवबंधन बांधण्यापूर्वी त्यांनी प्रतिक्रिया दिली. कुठली जबाबदारी असेल त्यावरही भाष्य केलं. वसंत मोरेंकडून मनसेला खिंडार वसंत मोरेंनी शिवसेनेत जाण्यापूर्वी मनसेला खिंडार पाडलं आहे. कारण त्यांच्यासह मनसेचे १७ शाखाध्यक्ष, पाच उपविभाग अध्यक्ष, एक शहाराध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी तसंच वाहतूक सेनेचे पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेत जाताना वसंत मोरेंनी मनसेला खिंडार पाडल्याची चर्चा आहे. वसंत मोरे म्हणाले, "यापैकी मी कुणालाही सक्ती केलेली नाही. पहिल्या दिवसापासून प्रत्येकाला सांगतो आहे की ज्यांना पक्षा राहायचं आहे ते राहू शकतात. मात्र जे काही राजकारण सुरु होतं ते लोकांनी पाहिलं आहे. मी कुणालाही जबरदस्ती केलेली नाही, सक्ती केलेली नाही. सगळे आपल्या मर्जीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत." वंचितला लोकसभा निवडणुकीला महिना पूर्ण झाल्यानंतर रामराम वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीला रामराम केला. त्याआधी त्यांनी मनसेला रामराम केला होता. आता ते शिवसेनेत असणार आहेत. वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकर यांना मेसेज केला, तसंच त्यांची भेटही घेतली. त्यांना आपण सॉरी म्हणालो आहोत असंही वसंत मोरेंनी सांगितलं. वसंत मोरेंनी पुणे लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यांच्या बंडाची खूप चर्चा सोशल मीडियावर झाली होती. आता शिवसेनेत काय भूमिका असेल याबाबतही वसंत मोरेंनी भाष्य केलं आहे. हे पण वाचा- Maharashtra News Live : वसंत मोरे आज बांधणार ठाकरेंचं शिवबंधन, पदाधिकारी अन् कार्यकर्तेही ठाकरे गटात! शिवसेनेत कुठली जबाबदारी असणार? शिवसेनेत कुठली जबाबदारी असणार? हे विचारलं असता, वसंत मोरे म्हणाले, "मला कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही. मी कोणताही शब्द उद्धव ठाकरेंकडून घेतलेला नाही. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पक्षात जात आहे. जी जबाबदारी मला पक्ष देईल ती जबाबदारी मी नक्कीच पूर्ण करेन" असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आता उद्धव ठाकरे त्यांना कुठली जबाबदारी देतात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.