तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबत लवकरच अध्यादेश काढून मतदारसंघांची फेररचना करून ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या जातील, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. किन्हवली येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या दशकपूर्ती सोहळा व विस्तारित इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विज्ञान प्रयोग शाळेला दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे विज्ञानशाळा असे नामकरण करण्यात आले.
विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद भानुशाली यांनी केलेल्या प्रास्ताविकात शहापूर तालुक्याला भेडसावणाऱ्या समस्यांचा ऊहापोह केला व विकास निधी देण्याची मागणी केली. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी अध्यक्षांना उद्देशून तुम्हाला कोण नाही म्हणू शकत नाही, असे सांगून भरीव मदत देऊ, पण नक्की आकडा सांगता येणार नाही, असे केवळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे परीक्षार्थीना त्रास..
बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू असतानाही हा उद्घाटन सोहळा आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडथळा निर्माण होत होता. कार्यक्रमात ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी ठेवण्यात आला होता. मात्र पोलिसांची नाकाबंदी आणि भाषण ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या गर्दीतून वाट काढत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात जावे लागत होते. दरम्यान, या सोहळ्याआधी तालुक्यातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. गेल्या १५ वर्षांत लोकांचा खूप अपेक्षाभंग झाला असून, सत्ता परिवर्तन झाले आहे. परंतु व्यवस्थेचे परिवर्तन होण्यास थोडा वेळ लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट करून आरोग्य, रोजगार, रस्ते सुधारणा इत्यादी विविध समस्यांबाबत सुधारणा करण्याचे वचन फडणवीस यांनी दिले.