आदिवासींच्या प्रथा-परंपरा जशा जगण्याशी, निसर्गाशी निगडित असतात तसेच त्यांचे देवदेखील. सातपुडय़ातील याहामोगी ही देवी महाराष्ट्र-गुजरातमधील सातपुडा विध्य पर्वतातील आदिवासींची एकमेव देवी आहे.

कोणत्याही गावात गेले की तेथे एखादे छोटे-मोठे देऊळ असतेच. पण आदिवासी समाजात मूर्ती आणि मंदिर या संकल्पनाच नाहीत. भरपूर झाडी असलेल्या भागात देवाचे प्रतीक म्हणून एखादा गोलाकार दगड किंवा रोवलेला लाकडी खुंटा दिसून येतो. पण तो प्रतीकापुरताच मर्यादित असतो. आजही सातपुडय़ातील आदिवासी गावांमध्ये, पाडय़ांवर असे देव उघडय़ावरच मांडून ठेवलेले दिसतील. ना त्याला काही छत ना तेथे रोजची पूजाअर्चा. पण याच सातपुडय़ात याहामोगीचे खूप मोठे स्थान आहे. सातपुडा पर्वताच्या रम्य प्रदेशात स्थित असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील दाब या गावी तसेच गुजरातमध्ये बगला नदीच्या परिसरात सागबारा तालुका (जिल्हा नर्मदा) येथे याहामोगी देवीचे मंदिर आहे. देवमोगरा येथे पूर्वी एक चंद्रमौळी कुडाचे घर दाब नावाच्या गवताचे छत असलेले होते. तेथे आता अदिवासींच्या घराच्या आकारानुसार छप्पराचा उतार असलेले सुंदर मंदिर उभे आहे. याहामोगी, देवमोगरा, याहा पांडुरी ही आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या मातेचीच अनेक नावे आहेत. मातेची यात्रा फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वकाळात भरते. आदिवासी लोक इतर कोणत्याही देवतांची पूजाअर्चा करताना दिसणार नाहीत. पण याहीमोगीचे अगदी निस्सीम भक्त असतात. एखाद्या छोटय़ाशा पाडय़ावरदेखील याहामोहीचा लाल-पांढऱ्या रंगाचा झेंडा लावलेला दिसून येतो. तसेच क्वचित एखाद्या पाडय़ावर देवीचे झोपडीतलेच मंदिरदेखील असते. पण सर्वाच श्रद्धेचे ठिकाण म्हणजे देवमोगरा.

uran marathi news, gaon dev yatra
उरण परिसरात गावदेवांच्या जत्रा सुरू
Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग

दाब मंडळातील पश्चिम दिशेकडील आंबुडापारीचे प्रमुख राजा तारामहल यांचे राज्य होते. त्यांची राणी उमरावाणू यांचा मुलगा राजा पांठा. तो अतिशय शूरवीर, शास्त्र पारंगत होता. राजा पांठाला नऊ राण्या होत्या. त्याची पट्टराणी देवरूपन होती. ती बाहगोरिया कोठारची मुलगी होती. बाहगोरियाची राणी माता देवगोंदर व राजा गोरिया कोठार यांची देवमोगरामाता ही मानस पुत्री होत. बाहगोऱ्या व देवगोंदरा यांना एक मुलगा होता. त्याचे अडाअ् ठाकोर किंवा विना ठाकोर असे होते. राजा पाठांशी देवमोगरा मातेचे लग्न झाल्याने राजा पांठा व विनाठाकोर हे दोघे चांगले मित्र व नात्याने सालेभाऊ होत. त्यांना आदिवासी भाषेत बेनीहजाहा म्हणतात. ते दोघे अत्यंत पराक्रमी, सामथ्र्यवान व बुद्धिमान होते.

देवमोगरा माता ही दाब राज्यातील मावसार पाटी भागातील एका धनिक आदिवासी कुटुंबातील चौथ्या क्रमांकाचे अपत्य होते. त्या भागात दुष्काळ पडल्यामुळे अन्नाच्या शोधात त्या दाब राज्यात आल्या होत्या. दुष्काळामुळे अन्न नव्हतेच, कंदमुळेदेखील नष्ट झाली होती. त्यामुळे त्या भुकेने व्याकूळ होऊन जंगलात एका झाडाखाली फुलाच्या वेलीत मरणासन्न अवस्थेत पडून होत्या. त्याच वेळी दाबचे राजा बाहगोऱ्या हे शिकारीला आले होते. त्यांना त्या मरणासन्न अवस्थेत सापडल्या. त्यांनी तिला घरी आणले आणि पोटच्या मुलीसारखे पालनपोषण केले. जंगलात सापडलेली अनाथ मुलगी म्हणून याहामोगीला पोहली पांडोर असेही म्हणतात. किंवा मोगरा फुलासारख्या वेली व झुडपात सापडल्यामुळे देवमोगरा असेही म्हणतात. त्यांचा विवाह राजा पांठा यांच्याशी झाला. राजा पांठाला बाहगोऱ्या यांच्याकडे सात वर्षे राहून राबावे लागले. म्हणजेच घरजावई म्हणून सेवा करावी लागली. नंतर काही गृहकलहामुळे राजा पांठा व माता मोगरा हे हल्लीचे देवमोगरा गाव (तालुका सागरबारा, गुजरात) जेथे आत्ता देवमोगराचे मंदिर आहे तेथे राहायला गेले. तेथे नंतर माता सवतीच्या कलहामुळे छोटेसे झोपडीवजा घर बांधून राहू लागल्या.

त्याच काळात दाब राज्यात बारा वर्षांचा दुष्काळ पडला. त्यात गुरे, ढोरे सर्व मरून गेले. लोकसुद्धा अन्नपाण्यावाचून मरू लागले. गाव सोडून इकडेतिकडे जाऊ लागले. दाब राज्य उजाड होऊ लागले. त्याकाळी याहामोगी यांनी हिमतीने आजूबाजूच्या राज्यात जाऊन राजा पांठा, विनाठाकोर यांच्या मदतीने अन्न, धान्य, जनावरे राज्यात आणली. दाब राज्यातील भूकमारीने पीडित जनतेला अन्न व पशुधन उपलब्ध करून दिले. त्यांच्या या मानवतावादी कार्यामुळे त्यांना ‘याहा’ म्हणू लागले. याहा म्हणजेच माता. मातेच्या या कार्यामुळे त्यांना अन्नदेवता म्हणून ओळखतात. म्हणूनच आदिवासी हे मातेची पूजा अन्नधान्याने करतात. मातेच्या स्वर्गवासानंतर त्यांचे पती राजा व भाऊ गंडा ठाकोर यांनी मातेची मूर्ती तयार करून मातीची कोठी बनवून त्यात स्थापना केली. परंतु परकीय आक्रमणाच्या भीतीने राजा पांठाच्या नंतरच्या पिढय़ांनी मातेची मूर्ती जमिनीत लपवून ठेवली. कालांतराने सागबारा राज्याचे राजे यांना शिकारीला गेले असता जंगलात मातेची मूर्ती मिळाली. त्यांनी पारंपरिक पद्धतीने आदिवासी घरांप्रमाणे गवताने शाकारलेले घर मंदिर म्हणून तयार केले व मातेच्या मूर्तीची स्थापना केली.

महाशिवरात्रीच्या काळात तेथे जत्रा भरते व तेथे पारंपरिक पद्धतीने पूजा होते. पूर्वी तेथे बकरा, रेडा बळी दिला जात असे. नंतर कोंबडी व दारू याचा नैवेद्य दिला जायचा. कच्चे धान्य हे आदिवासीच्या या पूजेत हमखास वापरले जाते. या सर्व पूजाविधींप्रमाणे मातेचे संबंध इतर प्रस्थापित धर्मरूढींशी जुळत नाहीत. मातेची स्थापना ही मातीच्या कोठीत केली आहे. तिला कोऱ्हणसुद्धा म्हणतात. आदिवासी लोक धनधान्य अशा कोठीत साठवतात, म्हणून मूर्तीची स्थापना कोठीत केली आहे. मातेच्या मूर्तीची माहिती अशी की, पांडुरी मातेची मूर्ती ही नंदुरबार जिल्हा व गुजरातमधील नर्मदा जिल्ह्य़ातील आदिवासी स्त्रिया पारंपरिक वेशभूषेत राहतात, तोच पेहराव मातेचा आहे. त्याला ‘खोयटी’ असे म्हणतात. यात नेसण्यासाठी लुगडय़ाचा एक भाग व डोक्यावरून घेण्यासाठी दुसरा भाग असा आहे. मातेच्या एका हातात लहान तांब्या आहे. त्याला ‘कोलीही’ म्हणतात. ते दूधदुभत्याचे प्रतीक आहे. तसेच दुसऱ्या हातात ‘दोअडो’ म्हणजेच दोरखंड. गाई-म्हशी जनावरे बांधण्यासाठी वापरतात म्हणून हा दोर खांद्यावर खाली सोडला आहे. त्यामुळे आजही आदिवासी खांद्यावर दोर घेऊन भानता करतात.

देवमोगरा मातेची स्थापना वर सांगितल्याप्रमाणे मातेची मूर्ती जंगलात सापडली होती व त्याची विधी पूर्वक स्थापना हिराजी चव्हाण या आदिवासी राजाने सुमारे एक ते दीड हजार वर्षांपूर्वी केली. सागबारा हे आदिवासी राजाचे राजधानीचे ठिकाण आहे. सागबारा हे सध्या तालुक्याचे ठिकाण असून नर्मदा जिल्ह्य़ात आहे. मातेचे भक्तगण हे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान व मध्य प्रदेश या चारही राज्यांतून मोठय़ा प्रमाणात येतात. तसेच देशभरातील इतरही आदिवासी लोक येत असतात. मातेच्या दर्शनाला जाताना आदिवासी जमाती बांबूपासून तयार केलेली टोपली पांढऱ्या फडक्याने बांधतात. त्यात भात, मोहाच्या फुलाच्या दारूची कुपी, बांगडय़ा, सिंदूर, अगरबत्ती, नारळ, सुपारी इ. मातेला अर्पण करण्यासाठी नेतात. सोबत नवसाची कोंबडी किंवा बकरादेखील असतो. पूजेसाठी असलेल्या या टोपलीला हिजारी असे म्हणतात.
गोअ्ड येथे मातेचे पती राजा पांठा यांचे वास्तव्य असते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे तेथे मातेची मूर्ती वर्षांतून एकदा आंघोळीसाठी नेली जाते. देवमोगरा येथे मातेच्या मंदिराच्या पश्चिम दिशेस अर्धा किलोमीटरवर गोअ्ड आहे. तेथे दोघांचे (जोडप्याचे मीलन होते) अशा श्रद्धा आहे, त्यामुळे त्या जागेवर शक्यतो स्त्रिया जात नाहीत. तशी बंदी वगैरे नाही.

गोअ्ड येथे पूर्वी फक्त एक शिळा होती. त्यालाच राजा पांठाची प्रतिमा समजून पूजा होत असे. तसेच पूर्वीपासून तेथे एक लाकडापासून तयार केलेले मगरीचे मुख आहे. त्याचीसुद्धा पूजा केली जाते. मगराची पूजा ही आफ्रिकेमध्येसुद्धा केली जाते. म्हणजेच जगाच्या पाठीवर आदिवासी जमाती या समान रूढी परंपरा सांभाळतात असे दिसून येते.

भगतसिंग पाडवी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा