मराठवाडय़ातील दुष्काळाच्या फेऱ्यात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तरुण संगणक अभियंत्यांनी लढा जगण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. देश-विदेशात वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या या वर्गमित्रांनी ५० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आíथक मदतीचा हात दिला.या कुटुंबांतील ५० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही खांद्यावर घेत पालकत्व स्वीकारले.
दुष्काळ मराठवाडा-विदर्भाच्या पाचवीलाच पुजलेला. गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू असलेल्या नैसर्गिक संकटांच्या मालिकेमुळे मराठवाडय़ातील शेतकरी कोसळून पडला. सततची नापिकी, खोलवर जाणारी पाणीपातळी, लहरी हवामान व शेतीतून तुटपुंजे उत्पन्न हे कमी म्हणून की काय, बाजारात शेतीमालास भाव नाही. त्यामुळे मराठवाडय़ाची शेती आणि शेतकरी देशोधडीला लागण्याची चिन्हे निर्माण झाली. या पाश्र्वभूमीवर संगणक अभियंता असलेल्या वर्गमित्रांनी एकत्र येत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना थोडा धीर देऊ या, असा संकल्प सोडला.
व्यवसायाने संगणक अभियंते, परंतु महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक व इतर कार्यात आवड. नोकरी पत्करल्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपात छोटय़ा-मोठय़ा सामाजिक कार्यात त्यांनी सहभाग घेतला. अमोल सुरोशे, प्रकाश िपपळे (राष्ट्रमाता जिजाऊ शैक्षणिक योजना, परभणी, िहगोली), श्याम वाढेकर (कर्तव्य फौंडेशन, परतूर, जालना), सुदर्शन जगदाळे (जीडीपी फौंडेशन, उस्मानाबाद) व सुधाकर पाटील (व्हिजन वेल्फेअर, धर्माबाद, नांदेड) यांनी आपल्या जवळच्या २० मित्रांकडून प्रत्येकी ५ हजार रुपये मदत गोळा केली. या प्रकारे जवळपास ५ लाख रुपयांपर्यंत निधी जमविण्याचे उद्दिष्ट  ठरवत कामाला सुरुवात केली. अमेरिका, सिंगापूर, थायलंड या ठिकाणी काम करणाऱ्या वर्गमित्रांनीही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी सढळ हस्ते मदत केली आणि बघता बघता ६ लाख ६७ हजार ५५४ रुपये जमले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना किंवा त्यांच्या विधवा पत्नीला तात्पुरता प्राथमिक हातभार म्हणून प्रत्येकी किमान १० हजार रुपये रोख मदत तातडीने केली. तसेच त्यांच्या मुलांची शाळा सुटू नये, या साठी त्यांच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घ्यायचे ठरविले.
या साठी सर्वात मोठी अडचण होती, ती अशा गरजवंत कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याची. या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी ग्रामीण भागात कार्य करणारे शिक्षक, स्थानिक पोलीस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पत्रकार यांच्या मदतीने माहिती गोळा करणे सुरू केले. समोर आलेली नावे पडताळून पाहिली. या कामी अनेकांची मदत घेण्यात आली. प्रत्यक्ष गावात जाऊन ज्या कुटुंबाला मदत द्यायची आहे, त्यांची भेट घेऊन त्यांना धनादेशाद्वारे ही मदत पोहोचवली.
ही मदत देणाऱ्या सर्व संगणक अभियंत्यांचे कार्यक्षेत्र छोटय़ा गावापासून थेट अमेरिकेपर्यंत. काहीजण चक्क अमराठी. मात्र, मराठवाडय़ात निर्माण झालेल्या या भीषण स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या सर्वाना एका विलक्षण आत्मीयतेने झपाटले आहे. या मित्रांनी एकत्र येऊन रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत ‘सेव्ह फार्मर्स’ उपक्रमास प्रारंभ केला.
– पाच-दहा हजारांसाठी घरातील कर्ता पुरुष जीव देतो! सुख-दुखाची जाणीवही ज्यांना नाही, अशा लेकरांकडे बघितले तर समजते की, आभाळंच फाटलेले. अशा वेळी अंतर्मुख होऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आधार देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
– अमोल सुरोशे
(संगणक अभियंता)