नारळ बागायतदार कीड रोगापेक्षा लाल तोंडाची माकडे आणि शेकरूला वैतागले आहेत. नारळीच्या झाडावरील थेट फळालाच भक्ष्य करणाऱ्या या माकडं, शेकरूचा वनखात्याने बंदोबस्त करण्याची मागणी आहे. अन्यथा पंचनामा करून शासनाने भरपाईची मागणीही आहे. विशेषत: सह्य़ाद्रीच्या पट्टय़ातील गावात वन्यप्राण्यांचा मोठा प्रादुर्भाव असल्याचे सांगण्यात येत आहे. नारळ बागायतदार सध्या पाणी प्रश्नावरदेखील संकटाच्या सावटाखाली आहेत. अनेक बागायतदारांना पाणी यंदा मिळण्याची भीती आहे. अपुरा पाऊस कोसळल्याने बागायतदारांना नैसर्गिक मिळणारे पाणी मे महिन्यापर्यंत टिकणार नसल्याची भीती कायम आहे. नारळाच्या झाडावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन बागायतींना धोका निर्माण झाला आहे. त्याच्यावर उपाय बागायतदार करत असतात, पण लाल तोंडाची माकडे व शेकरू नारळाच्या फळांना लक्ष्य करत असल्याने बागायतदार चिंतेत आहेत. कोनशी, असनिये, ओटवणे, इन्सुली, बिलवडे अशा गावांतील बागायतदारांनी लाल तोंडाची माकडे आणि शेकरूंचा वाढलेला उपद्रव पाहून चिंतेत आहे. त्यांच्यासाठी पर्याय शोधून काढूनही काहीच उपयोग नाही. हे बागायतदार स्थानिक असल्याने वन्य प्राण्यांना मारून टाकण्यात पुढाकार घेत नाहीत. मात्र परप्रांतीय वन्य प्राण्यांना मारून टाकून अन्य वन्य प्राण्यांत दहशत निर्माण करतात असे बोलले जात आहे. कोनशी गावातील सौरभ सिधये, काशीनाथ म्हसकर, मिलिंद कामत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लाल तोंडाची माकडे व शेकरूंची चिंता व्यक्त केली. नारळाच्या झाडांच्या फळांना लक्ष्य करणाऱ्या या दोन्ही प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. ओटवणे येथील प्रभाकर गावकर, जीजी मयेकर तर इन्सुली येथे प्रभाकर चव्हाण, सखाराम बागवे व चंद्रसेन सावंत, मोर्ये यांच्याशी चर्चा केली असता लाल तोंडाच्या माकडांचा कळप येतात, त्यांच्यापासून बागायतदारांना शासनाने संरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. नारळ पिकाला हमीभाव मिळावा अशी मागणी असून कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट मिळवून द्यायची गरजही सर्वानीच व्यक्त केली.

अभिमन्यू लोंढे