काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बी.जे. खताळ यांचे सोमवारी(१६ सप्टेंबर) पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. संगमनेरमधील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी दुपारी चार वाजता शहरातील प्रवरा नदीकाठावरील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे बी.जे. खताळ यांचा १६ मार्च १९१९ रोजी जन्म झाला होता. धांदरफळ, संगमनेर, बडोदा आणि पुण्यातून त्यांनी प्राथमिक ते उच्च शिक्षण घेतले. १९४३ ते १९६२ या कार्यकाळात त्यांना वकील म्हणून नावलौकीक मिळवला. त्यानंतर १९५२मध्ये प्रथम काँग्रेसच्या वतीने संगमनेरमधून पहिली निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची मागणी समोर आली. त्याला खताळ यांचा पाठिंबा होता. मात्र, काँग्रेसचे विरोधी धोरण असल्याने खताळ यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर १९६२ निवडणुकीत ते विजयी झाले. दरम्यान, १९५८मध्ये भाग सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. या कारखान्याचे ते मुख्य प्रवर्तक होते.

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात खताळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक, ए.आर. अंतुले, बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पाटबंधारे, कृषि, नियोजन, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, विधी व न्याय, माहिती, परिवहन आदी खात्याचे काम त्यांनी केले होते. वयाच्या ६५व्या वर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली होती. कठोर शिस्त आणि तत्वनिष्ठा असलेला राजकारणी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी वयाच्या ९३ वर्षानंतर लिखाणही केले. ‘गुलामगिरी’, ‘धिंड लोकशाहीची’, ‘गांधीजी असते तर’, ‘अंतरीचे धावे’, ‘लष्करी विळख्यातील पाकिस्तान’ यासह त्यांची सात पुस्तके प्रकाशित झालेली आहे. वाळ्याची शाळा हे पुस्तक लिहिल्यानंतर सर्वात वयोवृद्ध लेखक म्हणून ते चर्चेत आले होते.

सर्वाधिक धरणांची निर्मिती –
खताळ यांच्या कार्यकाळात राज्यात सर्वाधिक धरणांची निर्मिती झाली होती. कोल्हापुरचे दूधगंगा-वेदगंगा, सांगलीचे चांदोली-नांदोली, साताऱ्याचे धोम, पुण्याचे चासकमान, वर्ध्याचे अप्पर वर्धा, नांदेडचे विष्णुपुरी आदी धरणांची उभारणी त्याच्या काळात झाली.