मारवाडी फाऊंडेशनतर्फे दरवर्षी देण्यात प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार या वर्षी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार शरद जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी या पुरस्काराची घोषणा केली. हा पुरस्कार प्रदान समारंभ २० नोव्हेंबरला प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनी होईल.
सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचा एक अभूतपूर्व असा वारसा या राज्याला लाभला आहे. वारकरी संप्रदायापासून तर संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व इतर अनेक संतांनीही समाज जागरणाचे निष्ठेने काम केल्याची उदाहरणे आहेत. महाराष्ट्राला संत आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची परंपरा लाभली आहे त्याच परंपरेतील एक नाव म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव अभिमानाने घेता येईल. प्रबोधनकार ठाकरे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, या उद्देशाने मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने हा पुरस्कार सुरू करण्यात आला. या वर्षीचा पुरस्कार शेतक ऱ्यांसाठी अनेक वर्ष प्रबोधनाचे काम निस्वार्थपणे करणारे शरद जोशी यांना देण्यात येणार आहे. उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी शेतक ऱ्यांचे प्रबोधनाचे काम निस्वार्थपणे सुरू केले. उत्पादन खर्चाच्या आधारावर शेतमालाला योग्य भाव मिळावे, याबाबत जोशी यांनी शेतक ऱ्यांना दिलेले मागदर्शन मोलाचे आहे. त्यासाठी उभारलेले लढे महत्त्वाचे आहेत. त्यांच्या या कार्याप्रती त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आतापर्यंत हा पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भा.ल.भोळे, पन्नालाल सुराणा, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, डॉ. आ.ह. साळुंखे, प्रा. एन.डी. पाटील आणि रामकृष्णदादा बेलुरकर यांना प्रदान करण्यात
आला आहे.