कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये असून, त्यांना अद्यापही जामीन मंजूर झाला नाही आहे. त्यात संजय राऊत यांचे भाऊ शिवसेना आमदार सुनिल राऊत त्यांच्या जामिनासाठी सक्रिय झाले आहे. सुनिल राऊत यांनी मातोश्रीवर जात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेत दिल्ली गाठली होती. त्यामुळे याबाबत ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार का?, भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार का?, अशा चर्चांना उधाण आलं होते. त्यावर आता सुनिल राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“दिल्लीत संजय राऊत यांचं घर आहे. त्यासाठी दिल्लीत आलो होते. दिल्लीला येण्यापूर्वी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. संजय राऊतांच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार नाही. सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. संजय राऊतांवर ठेवण्यात आलेल्या आरोपपत्राला काडीचीही किंमत नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली,” असा आरोप सुनिल राऊत यांनी ईडीवर केला आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – भेटीगाठी सुरूच! मनसे नेते संदीप देशपांडे ‘सदिच्छा भेट’ घेण्यासाठी ‘वर्षा’वर; नेमकी काय चर्चा झाली? तर्क-वितर्कांना उधाण!

“संजय राऊतांच्या अटकेमुळे आवाज बंद…”

“भाजपाकडून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. संजय राऊत भाजपाच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध बोलत होते. त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली. मात्र, संजय राऊतांच्या अटकेमुळे आवाज बंद होणार नाही. आणखी काही संजय राऊत निर्माण होतील आणि भाजपाच्या अत्याचाराविरुद्ध लढतील,” असा हल्लाबोल सुनिल राऊत यांनी भाजपावर केला आहे.