लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. या प्रचाराच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. कोल्हापुरातील तपोवन मैदानावर शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कोल्हापूरातील सभेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात सभा होत आहे. यावरुनच संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, “शाहू महाराज छत्रपती यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी कोल्हापुरात येत आहेत, पण जनता हे कधीही विसरणार नाही”, असा निशाणा संजय राऊत यांनी साधला.

हेही वाचा : काँग्रेसला धक्का! माजी मंत्री नसीम खान यांनी मोठा आरोप करत प्रचाराला दिला नकार

संजय राऊत काय म्हणाले?

“छत्रपती शाहू महाराज यांचं या देशात मोठं योगदान आहे. ज्या छत्रपती शाहू महाराजांनी देशाला पुरोगामी विचार दिला. शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी कोल्हापूरमध्ये येत आहेत, हे ऐकून आश्चर्य वाटलं. खरं तर भारतीय जनता पक्षाने कोल्हापूरमध्ये उमेदवार उभा करणं हेच चूक आहे. आमची इच्छा होती की, शाहू महाराज छत्रपती यांना बिनविरोध निवडून द्यावं. महाराष्ट्राची शाहू, फुले, आंबेडकरांची परंपरा आहे, त्या परंपरेचा सन्मान करावा”, असं संजय राऊत म्हणाले.

“खरं तर कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती. आम्ही ती जागा शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी सोडली. मात्र, नरेंद्र मोदी हे शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्रातील जनता हे कधीही विसरणार नाही. कोल्हापूरच्या गादीपुढे नरेंद्र मोदी हे कुणीही नाहीत. भारतीय जनता पक्ष कोल्हापूरच्या गादीचा अपमान करत आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.