गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कॉंग्रेससोबत हातमिळवणी करणाऱया भाजपला त्याचा मित्रपक्ष शिवसेनेने शुक्रवारी चिमटे काढले आहेत. संघाचे संस्कार असलेल्या स्वच्छ मनाच्या भाजपने अध्यक्षपदासाठी कॉंग्रेससोबत हात मिळवला, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. हा चमत्कार दाखवायला हिंमत आणि धाडस लागते. ती हिंमत आपल्यात असल्याचे भाजपने दाखवून दिले असल्याचे शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील अग्रलेखात म्हणण्यात आले आहे. शिवसेना आणि भाजप एकमेकांसोबत सत्तेत सहभागी असले तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. त्याचाच प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, ‘भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आला आहे व विधानसभेत कॉंग्रेसने भाजप मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे व अनागोंदीचे आरोप केले. त्यामुळे कॉंग्रेसने भ्रष्टाचारास मिठी मारली की भाजपने कालच्या भ्रष्टाचार्‍यांना पवित्र करून सोयरिक जमवली हे कळायला मार्ग नाही. म्हणजे भाजपला कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचारी वाटला नाही आणि कॉंग्रेसलाही भाजप जातीयवादी असल्याचा विसर पडला. हादेखील एक चमत्कारच आहे. ज्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीविरोधात झगडे करायचे व त्यांनाच बोहोल्यावर घेऊन सत्तेसाठी मिठ्या मारायच्या ही लोकांशी प्रतारणा आहे,’ अशी टीका करण्यात आली आहे.
भाजपने कोणासोबत जावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. असे असले तरी ज्यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढायचे त्यांच्याशीच हातमिळवणी करून मिरवायचे. यामुळे यामुळे तात्पुरते सुख मिळाले असले, तरी या सुखाचे काटे भविष्यात टोचतील, असाही इशारा शिवसेनेने दिला आहे.