गेल्या काही दिवसांपासून शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह नेमकं कुणाला मिळणार? यासंदर्भातली उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. निवडणूक आयोगासमोर यासंदर्भात सध्या सुनावणी सुरू असून ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंनी आयोगासमोर युक्तिवाद केला आहे. आता आयोगाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांच्या धमक्यांमुळे आम्ही शिवसेना सोडली, असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून केला जात असताना त्यावर संजय राऊतांनी खोचक शब्दांत टीकास्र सोडलं आहे.
“ते भाषण तर शीतल म्हात्रेंचं होतं”
बंड करून गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दंडुक्यांनी मारणम्याची भाषा आपण केलीच नव्हती, असं राऊतांनी आज माध्यमांना सांगितलं. “लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असं भाषण मला वाटतं आज त्यांच्या गटात असणाऱ्या शीतल म्हात्रे यांनीच अलिबागच्या सभेत केलं होतं. त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की नेमके ते का सोडून गेले? मी धमक्या दिल्यामुळे सोडून गेले की शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससह युती केल्यामुळे सोडून गेले की हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून ते सोडून गेले. त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे. ते प्रत्येक वेळा भूमिका बदलतात”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“…म्हणून १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय पुढे ढकलला जातोय”, शिवसेनेचा सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल!
“ते खोके मिळाल्यामुळे सोडून गेले. हा धमकीचा विषय आत्ता आलाय. ते ज्या माझ्या भाषणाचा उल्लेख करतायत, ते भाषण मी हे लोक सुरतवरून गुवाहाटीला पोहोचल्यानंतर दहिसरला केलेलं आहे. ते भाषण काळजीपूर्वक पाहा तुम्ही. म्हणजे कळेल त्यांना मी काय बोललोय ते. यांना आल्यावर दंडुक्यांनी बडवा, यांचा पार्श्वभाग सुजवा आल्यावर असं त्यांच्या प्रवक्या शीतल म्हात्रे यांनीच शिवसेनेत असताना केलेलं भाष्य आहे. त्यानंतर त्या गुवाहाटीला जाऊन त्यांना मिळाल्या. हे यांचं वैफल्य आहे. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय अशी प्रत्येक लढाई ते हरणार आहेत”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर टीका!
दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरूनही मोदी सरकारवर टीका केली. “अर्थसंकल्पात घोषणा फार असतात. इतकीच अपेक्षा आहे की दोन-पाच उद्योगपतींना, कॉर्पोरेट विश्वाला समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला जाऊ नये. या देशात शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, मजूर आहेत. ते आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर झाला, तर त्याचं स्वागत केलं जाईल. नाहीतर दोनजण खरेदी करतात, दोनजण विकतात असं जे राहुल गांधी म्हणतात, फक्त दोघांसाठीच देशाची अर्थव्यवस्था राबवली जाते, त्यामुळे हा देश आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात जाईल. ती जातेच आहे सध्या”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.