महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. अशातच आज (९ एप्रिल) मुंबईत मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, त्यापूर्वी मनसेच्या महायुतीतील सहभागाबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

“राज ठाकरेंनी महायुतीत यावं की नाही, हा वरिष्ठ पातळीवरील चर्चेचा विषय आहे. मी याविषयी भाष्य करणं योग्य नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्वत: राज ठाकरे याबाबत चर्चा करतील. मात्र, मनसे जर महायुतीत येणार असेल, तर आम्हाला त्याचा आनंदच आहे. कारण समविचारी पक्ष एकत्र आले, लोक सकारात्मक पद्धतीने मतदान करतील”, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीसांनी माझ्या नावाची घोषणा केली असली तरी…” कल्याणच्या उमेदवारीवरून श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया

फडणवीसांनीही केले होते सूचक विधान

दरम्यान, मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी देखील सुचक विधान केले होते. “मनसेबरोबर युतीसंदर्भात आमच्या चर्चा झाल्या आहेत. मनसेने हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यापासून त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. राज ठाकरे हे पहिले व्यक्ती होते की २०१४ साली त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जाहीरपणे भूमिका घेतली होती. त्यानंतर मधल्या काही काळात त्यांनी वेगळी भूमिका घेतली. मात्र, गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे विकास केला. ज्यांच्यासाठी समाज प्रथम आहे, अशा सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी राहिले पाहिजे. त्यामुळे मला विश्वास आहे की, राज ठाकरे यांची मनसेही महायुतीबरोबर निश्चित येईल. याबाबतचा निर्णय राज ठाकरे यांना घ्यायचा आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.