मागील काही दिवसांपासून कल्याणच्या उमेदवारीवरून महायुतीत धुसफूस असल्याची चर्चा होती. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन कल्याणचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे या जागेचा पेच संपुष्टात आल्याचं बोललं जात होते. मात्र, फडणवीसांच्या घोषणेनंतर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली असली, तरी माझी उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही, असे ते म्हणाले. श्रीकांत शिंदे यांच्या विधानानंतर आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

हेही वाचा – मनसे महायुतीत जाणार की नाही? राज ठाकरेंची भूमिका आज स्पष्ट होणार; पाडवा मेळाव्यात कोण…

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी माझ्या उमेदवारीची घोषणी केली होती, त्याचं मी स्वागत करतो. मात्र, त्यांनी घोषणा केली असली, तरी माझ्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतरीत्या घोषणा केलेली नाही. आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा पक्ष एका व्यक्तीपूरता मर्यादित नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस; ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची राजकीय बैठक…

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाचा विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधील शिवसेनेचे आणि महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. यावेळी सुद्धा ते भरघोस मतांनी निवडून येतील. आम्ही सर्व महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना निवडून आणू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.