अलिबाग- जिल्ह्याधिकारी कार्यालयात एरवी आगंतूकांची वर्दळ कायमच सुरू असते. निरनिराळी कामे घेऊन याचिकाकर्ते कार्याललयात येत असतात. पण गुरूवारी एक आगंतुक जिल्हाधिकारी कार्यालयात आला आणि सर्वांनाचेच धाबे दणाणले.

गुरूवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दैनंदिन कामकाजाला सुरूवात झाली. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. खालच्या मजल्यावर असलेल्या नोंदणी शाखेत येणारे जाणारे याचिकाकर्ते आपली टपाल नोंदवित होती. साडेबाराच्या सुमारास एक महिला कर्मचारी कक्षातील जमा झालेल्या फायलीची आवरासावर करत असतांना, तिच्या हाताला स्पंजसारख्या वस्तूचा स्पर्ष झाला. निटनीरखून पाहीले असता, फाईलींच्या आडोश्यात एक भला मोठा साप लपून बसल्याचे लक्षात आहे. सापाला पाहून कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. घाबरून सर्वजण कक्षाच्या बाहेर जाऊन उभे राहीले.

हेही वाचा >>>श्रीमंत शाहू महाराजांनी निवडणुकीला उभे राहू नये असे वाटते; हसन मुश्रीफ

जिल्हाधिकारी कार्यालयात साप शिरल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्व विभागात परसली, साप पाहण्यासाठी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनी जमा झाला. काही जण अपृप म्हणून तर काही जण भितीने सापाला बघत होते. अशातच काही सतर्क कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांना फोन लावून बोलावले. सर्पमित्राने येऊन सापाला पकडले. हा साप धामण प्रजातीला आणि बिनविषारी असल्याचे सांगितले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र हा साप थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती भागात शिरला कसा याचा शोध लागू शकलेला नाही. या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराची साफसफाई करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.