सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल सुनावला आहे. यावेळी न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सगळे निर्णय चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. शिवाय शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती हे बेकायदेशीर आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली असली तरी ते पुन्हा एकदा शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्त केले जाऊ शकतात, याबाबतचं सूचक विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय कधी घेणार? विधानसभा अध्यक्षांनी दिलं उत्तर, म्हणाले…
भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर होती, या न्यायालयाच्या निर्णयाबद्दल विचारलं असता राहुल नार्वेकर म्हणाले,”आपल्याला हा विषय थोडासा समजून घेण्याची गरज आहे. शिवसेना प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची जी नियुक्ती करण्यात आली होती, ती नियुक्ती योग्य नसल्याचंच केवळ न्यायालयाने सांगितलं आहे. याचं कारणही न्यायालयाने सांगितलं आहे. भरत गोगावले हे राजकीय पार्टीचे प्रतिनिधी होते का? याबद्दलची आपण खातरजमा करून घ्यावी आणि त्यानंतर आपण निर्णय द्यावा, असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे भरत गोगावले किंवा एकनाथ शिंदे यांची नियुक्ती कायमस्वरुपी अयोग्य आहे, असं न्यायालयाने म्हटलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांची नियुक्ती पुन्हा करू शकतो.”
हेही वाचा- “…तर अपात्रतेचा निर्णय घेण्यास विलंब होईल”, लंडनहून परतताच विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान
“भरत गोगावले हे मुख्य प्रतोद आहेत की सुनील प्रभू? या प्रश्नाचं उत्तर देताना राजकीय पार्टीचं प्रतिनिधीत्व कोण करत होतं, हे पाहावं लागेल. भरत गोगावलेंना प्रतोदपदी नियुक्त केलेली व्यक्ती की सुनील प्रभू यांना प्रतोदपदी नियुक्त केलेली व्यक्ती… राजकीय पार्टीच्या वतीने व्हिप जारी करण्यासाठी यापैकी कोणती व्यक्ती अधिकृत होती? हे आपल्याला बघावं लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया राजकीय पार्टी कोणाची आहे, यापासून सुरू होणार आहे,” असंही नार्वेकर म्हणाले.