कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ांमध्ये प्रवाशांच्या लूटमारीला आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. ‘मत्स्यगंधा एक्स्प्रेस’मधून प्रवास करणाऱ्या दोघा जणांना बिस्किटातून गुंगीचे औषध देऊन साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्याचा प्रकार गेल्या आठवडय़ात घडला. या पाश्र्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी खास दक्षता मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये एक निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोकण रेल्वेमार्गावरील गाडय़ांमध्ये हे पथक अचानक तपासणी करून प्रवाशांची चौकशी करते. त्यापैकी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली जाते. कोकण रेल्वे मार्गावर रात्री गाडय़ा क्रॉसिंगसाठी थांबल्या असता महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचे प्रकार घडतात. त्यांना आळा घालण्यासाठी मुंबईहून निघणाऱ्या गाडय़ांमध्ये महिला पोलीस साध्या वेशात प्रवास करणार आहेत आणि संबंधित गाडीमध्ये संशयित आढळल्यास मोबाइल फोन किंवा एमएमएसद्वारे खास सुरक्षा पथकाला माहिती देणार आहेत. त्यामुळे अशा चोरटय़ांना सापळा रचून पकडणे शक्य होईल, अशी अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त या मार्गावरील सर्व रेल्वेगाडय़ांच्या डब्यामध्ये रेल्वे पोलिसांचे मोबाइल क्रमांक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे जागरूक प्रवासीही काही संशयास्पद प्रकार वाटल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधू शकतील.
रेल्वेचे साहाय्यक सुरक्षा आयुक्त चंद्रशेखर इंगळे यांनी रोहा ते मडुरे (सिंधुदुर्ग) या मार्गावरील रेल्वेप्रवासाची प्रत्यक्ष पाहणी करून ही सुरक्षा मोहीम तयार केली आहे.
रेल्वेमध्ये हरवणाऱ्या लहान मुलांच्या पालकांचा ‘चाइल्ड लाइन’ संस्थेतर्फे शोध घेऊन मुले त्यांच्या ताब्यात देण्याची कार्यवाहीही रेल्वे सुरक्षा दलातर्फे चांगल्या प्रकारे पार पाडली जात आहे. गेल्या वर्षभरात अशा सुमारे २१ हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.