पोलिसांनी ऊसदरासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या छातीवर गोळ्या झाडायला नको होत्या, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. ‘पोलीस शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकत होते. मात्र त्यांनी छातीवर गोळ्या झाडल्या. पोलिसांची ही कृती चुकीचीच आहे,’ असे दानवे यांनी म्हटले. गुरुवारी दानवेंनी ऊसदर आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या घटनेबद्दल प्रसारसामाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

अहमदनगरमधील शेवगावमध्ये बुधवारी ऊसदरासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले. या जखमी शेतकऱ्यांची दानवेंनी भेट घेतली. यावेळी त्यांनी जखमी शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती दिली. यावेळी बोलताना, पोलिसांकडून झालेला गोळीबार चुकीचाच असल्याचे ते म्हणाले. ‘गोळीबार छातीवर करायचा नसतो. मात्र जमावावर ज्याप्रकारे गोळ्या झाडण्यात आल्या, ती कृती चुकीचीच आहे. पोलीस पायावर गोळी झाडू शकते. मात्र ती छातीवर लागली. पोलिसांचे हे कृत्य अयोग्य आहे,’ असे दानवेंनी म्हटले.

पोलिसांच्या कृतीला चुकीचे म्हणणाऱ्या दानवे यांनी गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मात्र सावरुन घेतले. ‘मुख्यमंत्र्यांनी गृहखाते सांभाळण्यास सुरुवात केल्यापासून पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. अशाप्रकारची घटना पुढे घडणार नाही, अशी खात्री ते बाळगतील. ज्यावेळी आमची बैठक होईल, त्यावेळी आम्ही यावर चर्चा करु,’ असे दानवेंनी म्हटले. ‘गोळीबाराच्या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची किंवा त्यांनी गृहखाते सोडण्याची आवश्यकता नाही,’ असेही ते म्हणाले. ऊसदर आंदोलन योग्य पद्धतीने न हाताळल्याने ही घटना घडल्याची कबुली देतानाच शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल, असे आश्वासनही दानवेंनी दिले.