पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून वाद सुरू आहे. या पुस्तकावर सगळ्यांनीच टीका केली असून, पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. “पंतप्रधान मोदींनी सात जन्म घेतले, तरी शिवाजी महाराजांच्या एका क्षणाचीही बरोबरी त्यांना करता येणार नाही,” अशी टीका कडू यांनी केली आहे.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाविषयी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ट्विटरवरून भूमिका मांडली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊ शकत नाही. सात जन्म नाही. सात पिढ्या नाही, तर अख्ख आयुष्य झिजवलं, तरी मोदींची तुलना छत्रपतींशी करू शकत नाही. छत्रपतींच्या आयुष्यातील एक प्रसंगासारखा देखील संघर्ष मोदींनी केलेला नाही. असे तुलनात्मक पुस्तक काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यावर बंदी घालायला पाहिजे. अशा प्रथा मोडीत काढणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. त्या स्वराज्याचे हे (मोदी) फक्त पाईक आहे. पाईक म्हणू शकतो. शिवाजी महाराज होणं फार दूरची गोष्ट आहे. शेतकऱ्याच्या काडीच्या देठाला हात लावू नका, असे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरीकडं अख्खा शेतकरी लुटून बरबाद करणारे महाशय असलेले मोदी यांची तुलना होऊ शकत नाही,” अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली.

आणखी वाचा – ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे भाजपा कार्यालयात प्रकाशन

आणखी वाचा – …तर पुस्तक मागे घेण्यास तयार – जयभगवान गोयल

लेखक जय भगवान गोयल म्हणतात?

पुस्तकावर वाद निर्माण झाल्यानंतर पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांनीही भूमिका मांडली आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून भारताला कोणीही वाली नव्हता. आपल्या संसदेवर मुंबईत दहशतवादी हल्ला करण्यात आला. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतावर एकही हल्ला झालेला नाही. पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला. यावर मोदी सरकारने पाकिस्तानमध्ये घूसून प्रत्युत्तर दिलं.”

“शिवाजी महाराज ज्याप्रमाणे प्रत्येकाची, राज्यातील माता, बहिणींची चिंता करायचे तसंच मोदी देशातील माता, बहिणींच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. आज प्रत्येक महिलेला आपण सक्षम असल्याचं वाटत आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे, त्याप्रमाणेच नरेंद्र मोदी काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात भारताचा सन्मान वाढला आहे.”