सांगलीतील चित्र, जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

एकीकडे महापुराने पश्चिम भागाची दैना उडविली असताना जिल्ह्य़ाच्या पूर्व भागातील ९६ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे, तर अद्याप २६ हजार पशुधन चाऱ्यासाठी छावणीतील दावणीला बंदिस्त आहे. पावसाच्या हंगामाचे तीन महिने संपल्यानंतरही दुष्काळग्रस्तांची कुतरओढ सुरू असून एकाच जिल्ह्य़ात निसर्गाचा लहरीपणा अनुभवास येत आहे.

गेले पंधरा दिवस सांगलीसह जिल्ह्य़ातील पलूस, मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील १०४ गावांना महापुराचा तडाखा बसला. कोटय़वधीची पूरहानी होऊन सांगलीची बाजारपेठ थंड झाली. नदीकाठी असलेल्या गावातील घराघरात कृष्णामाईचे पाणी आले.

महापुराच्या ९ दिवसांच्या काळात सुमारे ५५ टीएमसी पाणी वाहून गेले. पावसाचा हंगामही अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पश्चिमेकडील पावसाचा हंगाम नारळी पौर्णिमेनंतर संपला असल्याचे मानले जाते.

मात्र पावसाळी हंगामाच्या पहिल्या टप्प्यात जत आणि आटपाडी या तालुक्यांसह पूर्व भागातील कवठेमहांकाळ, विटा, तासगाव आणि मिरज तालुक्याच्या पूर्व भागात अपेक्षित पाऊसच झालेला नाही. केवळ धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पश्चिम भागातील शिराळा तालुक्यात ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात सलग ९ दिवस अतिवृष्टी झाली. या दरम्यान पूर्व भागात केवळ ढगाळ हवामान अनुभवण्यास आले. यामुळे पूर्व भागातील पाण्याचे स्रोत सुरु झाले नसल्याने पिण्याच्या पाण्याची वाणवा कायम आहे. तसेच माळरानावर अद्याप गवतच उगवले नसल्याने जनावरांसाठी चाऱ्याचा  प्रश्नही गंभीर आहे.

छावण्याही अजून सुरू

जत तालुक्यामध्ये ६७ गावे, कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यातील प्रत्येकी ३,  खानापूर तालुक्यातील ३ आणि आटपाडी तालुक्यातील २० गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. सुमारे दोन लाख लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. तर जत तालुक्यात ५ हजार ८३७ आणि आटपाडी तालुक्यात २० हजार १०१ जनावरे छावणीच्या दावणीला आहेत.