लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार निरनिराळे फंडे वापरत असल्याचं पाहायला मिळतं. तर प्रचारसभांसाठी बॉलिवूड कलाकारांना आमंत्रित करण्याचा जुना फॉर्म्युला आजही प्रचलित आहे. सेलिब्रिटींना पाहण्यासाठी सामान्य लोक उत्सुक असतात. म्हणूनच प्रचारसभांसाठी त्यांना आमंत्रित केलं जातं. काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंब्यावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. विदर्भातील तिवसा इथल्या प्रचारसभेसाठी त्यांनी अभिनेता सुनील शेट्टीला बोलावलं होतं.

ही प्रचारसभा सायंकाळच्या वेळेस आयोजित करण्यात आली होती आणि सुनील शेट्टीला पाहण्यासाठी चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. त्याची एक झलक पाहायला मिळावी यासाठी सभास्थळी लोकांची झुंबड उडाली. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकही अपयशी ठरत होते. काहींनी तर मंचावर चढण्याचाही प्रयत्न केला.

लोकांची गर्दी पाहून आयोजकांनी अखेर सुनील शेट्टी यांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला. मंचावर येऊन दहा मिनिटं होत नाहीत तोवर सुनील शेट्टीला तिथून पळ काढावा लागला. स्टेजच्या मागच्या बाजूने त्याला सुरक्षितरित्या पाठवण्यात आले. मात्र तिथेही लोकांची चांगलीच गर्दी जमली होती.