रवींद्र जुनारकर

शाळांमध्ये विलगीकरणात असलेल्या लोकांसाठी दारूचा पुरवठा करणाऱ्या तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ४० लीटर दारू रेखेगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भास्कर सातपुते, ओंकार शेंगर आणि प्रफुल्ल उरांडे या तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोनाच्या टाळेबंदीत अनेकांना विलगीकरणात ठेवले जात आहे. बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास आमगाव येथून तीन जण दारूच्या कॅन घेऊन रेखेगाव मार्गे जात होते. त्यांच्याकडील कॅन आणि संशयास्पद हालचाल पाहून रेखेगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी त्यांना अडवले. त्यांच्याजवळील कॅन तपासले असता त्यात मोहाची दारू असल्याचे निदर्शनास आले. रेखेगाव, आनंदपूर तसेच आसपासच्या इतरही गावात विलगीकरणात असलेल्या लोकांना ही दारू पुरवली जात असल्याचे यावेळी निदर्शनास आले.

येथील पोलीस पाटील मोताबाई नरोटे यांनी ही माहिती आमगावच्या सरपंच भविका देवताळे आणि ग्रामपंचायत सदस्य प्रेमिला बैस यांना दिली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. घोट पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून तीनही आरोपींना वाहनांसाह ताब्यात घेतले.

चामोर्शी तालुक्यातील अनेक गावातून शेकडो नागरिक तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. यातील परत आलेल्या लोकांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गावाच्या बाहेर असलेल्या शाळा व इतरही ठिकाणी विलगीकरणात ठेवले आहे. या लोकांना आसपासच्या गावातील अनेक जण दारूचा पुरवठा करीत असल्याचे या कारवाईतून समोर आहे. अशा प्रकारामुळे कोरोंना संसर्गाचा धोका वाढला आहे. याकडे तालुका व स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.