राज्यात स्वाइन फ्लूमुळे ८३ जण दगावले असून, त्यात नागपूर विभागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे. या रोगाचे प्रमाण राज्याच्या ४० टक्के भागात आहे. या विभागात परिस्थिती गंभीर असली तरी नियंत्रणात असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
डॉ. सावंत यांनी नागपूर जिल्ह्य़ाला भेट देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वाइन फ्लू संदर्भात  आरोग्य विभागाची बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. सावंत म्हणाले,ह्व१ जानेवारीपासून राज्यात ९७ हजार २४८ लोकांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ६ हजार ८८६ रुग्णांना औषधे वितरित करण्यात आली आहे. राज्यात आज १०९ रुग्ण स्वाइन फ्लूचे संशयित आढळून आले असून, या आकडा येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे.
नागपूर शहरात २२ जण दगावले. पुणे, मुंबई आणि नागपुरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील शासकीय, महापालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण असून त्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहेत. खासगी रुग्णालयात असलेल्या रुग्णांना औषधांचा साठा हवा असेल आणि संबंधित रुग्णालयांनी रुग्णांची संख्या आणि त्यांची नावे दिली तर त्यांना औषधांचा पुरवठा करण्यात येईल. या औषधांचा काळाबाजार होऊ नये यासाठी प्रशासन पातळीवर लक्ष ठेवले जात आहे.  राज्य शासनाकडे स्वाइन फ्लूसाठी औषधसाठा उपलब्ध आहे. तो कमी पडू दिला जाणार नाही. मास्क पुरेशे आहेत. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये तपासणी आणि औषधांसाठी जास्तीचे पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यावर प्रशासन नियंत्रण ठेवून आहे. शासकीय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये जीवन रक्षक प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची आवश्यकता नाही. राज्यात दहा स्क्रिनिंग सेंटर सुरू करण्यात आले आहेत. लससंदर्भात दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे. असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.