“भारतीय जनता पक्ष आता स्वयंपूर्ण झाला असून आपला कारभार स्वतंत्रपणे करतो”, असं विधान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून भाजपाला आता आरएएसची गरज नसल्याचं म्हटलं जातंय. जे. पी. नड्डा यांच्या या विधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक वसंत काणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

जे पी नड्डा नेमकं काय म्हणाले?

“सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू. तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज पडत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत. त्यामुळे भाजपा स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळते. हा या दोन्ही कालखंडातला फरक आहे”, असं जे.पी. नड्डा म्हणाले. भाजपाला आता संघाच्या पाठिंब्याची गरज पडत नाही का? असं विचारलं असता नड्डा म्हणाले, “पक्षाची आता वाढ झाली आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची कर्तव्य आणि भूमिका आहेत. आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आम्ही राजकीय संघटना आहोत. इथे गरजेचा प्रश्न नाही. आरएसएस ही एक वैचारिक शाखा आहे. ते वैचारिक दृष्टीने आपलं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं कामकाज पाहतो. हेच तर राजकीय पक्षांनी करायला हवं”, असं जे. पी. नड्डा म्हणाले.

हेही वाचा >> “पूर्वी भाजपाला RSS ची गरज लागत होती, आता…”, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपा स्वयंपूर्ण आहे!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसंत काणे काय म्हणाले?

“जे. पी. नड्डांचं वक्तव्य कोणत्या संदर्भात हे थोडंसं स्पष्ट होत नाहीय. भाजपाच्या भूमिकेशी सहमत असलेले संघाचे स्वयंसेवकच नव्हे तर अशा ज्या कोणी समाजात व्यक्ती असतील त्यांची मदत त्यांना होत असेल हे बरोबर आहे. त्यासंदर्भात त्यानी वक्तव्य केलं असेल. पण संघाची मूळ अपेक्षा हीच आहे की तुम्ही स्वंयपूर्ण व्हा. स्वतःच्या भरवश्यावर उभे राहा. कोणावरही अवलंबून राहू नका. आणि भाजपाने ही अवस्था केव्हाच प्राप्त केली असेल. एवढा मोठा राजकीय पक्ष, १० वर्षे सत्तेवर आहे आणि तो स्वंयपूर्ण नाही असं असूच शकत नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अशी स्थिती असू शकते. प्रारंभीच्या कारणात प्रतिष्ठा, ओळख लागते. त्यादृष्टीने काही सहाय्य संघाचे झालं असू शकेल हे शक्य आहे. त्या व्यतिरिक्त आता ते म्हणतात की आम्ही स्वंयपूर्ण आहोत, याचा अर्थ आम्ही पूर्णपणे उद्दीष्ट गाठलं आहे, आता आम्हाला कोणाचीही गरज नाही. आणि हेच संघालाही अपेक्षित आहे”, असं आरएसएसचे अभ्यासक वसंत काणे म्हणाले.