शहरातील हडको आणि सिडको भागात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईमुळे वाढलेला ताण शनिवारी शिगेला पोहोचला. यातच पाच-सहा अज्ञात युवकांनी सिडको भागातील वॉटर युटिलिटीच्या कार्यालयावरच हल्ला चढवला. यात कंपनीच्या सुरक्षारक्षक अभयसिंह परिहार जखमी झाला. दुपारी २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या कार्यालयास पाच-सहा जण अचानक घुसले. त्यांनी काचा फोडल्या. कंपनीतील कपाटे फोडली. या घटनेची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
शहरातील हडको आणि सिडको भागात गेल्या ९ दिवसांपासून पाणी येत नसल्यामुळे नागरिक वैतागले आहेत. शुक्रवारी यामुळे नगरसेवकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली होती. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे गौरीशंकर बसू यांना शहरातील विश्वभारती कॉलनीत नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी धक्काबुक्की केली होती. शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्यासह नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना निवेदनही दिले होते. वीज गेल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे समांतरच्या ठेकेदारांनी शुक्रवारी सांगितले होते. मात्र शनिवारीही पाण्याची ओरड कायम होती. सिडको आणि हडको भागात पाणी नसल्याने नागरिकांचा संताप होताच. काही कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना उद्धट उत्तरे दिली होती. दुपारी अडीचच्या सुमारास पाच-सहा अज्ञात युवकांनी कंपनीच्या कार्यालयावर थेट हल्ला चढवला. तोंडाला रुमाल बांधलेल्या या युवकांच्या हातात लाठय़ा होत्या. कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणांना सुरक्षारक्षक अभयसिंह परिहार यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली. यात सुरक्षारक्षकाच्या हाताला दुखापत झाली आहे. सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पाणी केव्हा येणार, हा प्रश्न विचारून नागरिकांनी नगरसेवकांना भंडावून सोडले. पाणीपुरवठा सुरळीत होण्यास किती दिवस लागतील याचे उत्तर आजही मिळाले नाही. परिणामी नागरिकांमध्ये रोष वाढू लागला आहे.