Premium

“…तर विरोधकांना तोंड दाखवणं कठीण होईल”, बावनकुळेंच्या विधानावरील टीकेवर भाजपाचं प्रत्युत्तर

“पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल”, असं बावनकुळे म्हणाले होते.

Chandrashekhar Bawankule (1)
चंद्रशेखर बावनकुळे (संग्रहित छायाचित्र)

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान आज बरंच चर्चेत आहे. “भाजपाविरोधात पत्रकारांनी बातम्या छापू नयेत, म्हणून पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना चहा प्यायला न्यावं, ढाब्यावर जेवायला न्यावं”, असं आवाहन बावनकुळे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना केलंय. या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून विरोधकांनी यावर टीका केली आहे. विरोधकांच्या टीकेला आता भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करून प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले होते?

अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बावनकुळे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसंदर्भात मार्गदर्शन केलं. “पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा. तुम्ही ज्या बूथवर काम करताय. त्या बूथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे? त्याची माहिती घ्या. आपण इतकं चांगलं काम करतो, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या बूथवर जे चार-पाच कलाकार पत्रकार आहेत, त्यांची यादी बनवा. या पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. त्यांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये यासाठी त्यांना चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला बोलावणे म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. त्यांना ढाब्यावर वगैरे घेऊन जायचं. त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. आपल्याविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा >> “पत्रकारांना चहा प्यायला न्या”, बावनकुळेंच्या विधानावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, “भाजपाने एकतर…”

केशव उपाध्ये काय म्हणाले?

पत्रकारांशी संपर्क, संवाद ठेवा, इतकंच बावनकुळे यांच्या म्हणण्याचा अन्वयार्थ होता! पण त्यावर विरोधकांनी राईचा पर्वत केला. अंतर्गत बैठकांमध्ये कार्यकर्त्यांशी सोप्या आणि सहज अशा भाषेत बोललं जातं, हे विरोधकांना माहिती आहे.
पण राजकारण करायला दुसरे मुद्दे नसले की असे विषय जाणीवपूर्वक उचलले जातात. एकच लक्षात ठेवा… काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिल्लक सेनेचे पत्रकांराबद्दलचे विचार व केलेल्या कृती काढल्या, तर विरोधकांना तोंड दाखवण अवघड होईल. आणि हो… गप्पा तर चहावरच रंगतात ना!

सुप्रिया सुळेंनी काय केली टीका

विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे ही विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे.

हेही वाचा >> “भाजपाविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे”; बावनकुळेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

ज्याअर्थी चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करू द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Then it will be difficult for the opposition to show their face bjps explanation on bawankules statement sgk

First published on: 25-09-2023 at 16:06 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा