“आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उज्ज्वल निकम यांना भाजपाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान, वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली. ते न्युज १८ शी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“विजय वडेट्टीवार यांनी निरधारा आरोप केले असून याबद्दल मला वाईट वाटतंय. यामुळे पाकिस्तान सरकारला फायदा होऊ शकतो. ते असे दावे कशाच्या आधारे करत आहेत हे मला माहीत नाही. राजकारणात गुंतून तुम्ही आमच्या देशाची प्रतिमा मलिन करत आहात याचं आश्चर्य वाटतं”, असं उज्ज्वल निकम म्हणाले. “असे आरोप करून विरोधी पक्षनेते २६/११ च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा अनादर करत आहेत. ज्यांना माझ्या उमेदवारीची भीती वाटते ते अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत”, असेही उज्ज्वल निकम म्हणाले.

हेही वाचा >> “हेमंत करकरेंना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती, उज्ज्वल निकमांनी…”; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने खळबळ

निकम पुढे म्हणाले की, फाशीपूर्वी कसाबने एका न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कबूल केले होते की मुंबई हल्ल्याच्या वेळी त्याने आणि लष्कर-ए-तैयबाचे भरती इस्माईल खान यांनी पोलिस जीपवर अंदाधुंद गोळीबार केला होता, ज्यामुळे करकरे आणि पोलीस पथकातील इतर दोघांचा मृत्यू झाला होता.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे विधान वडेट्टीवार यांनी केले. त्यानंतर पुन्हा या विधानावर स्पष्टीकरण देताना वडेट्टीवार म्हणाले, “आपण हे एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन बोललो आहे. यामध्ये मी काहीही म्हटले नसून विलासराव देशमुख त्यावेळी म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याची गरज नाही. कारण कसाब दहशतवादी होता, त्याला फाशी होणारच होती. त्यामुळे बडेजावपणा दाखवायची गरज नाही. मी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला असून याबाबत त्यांना (उज्वल निकम यांना) काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी करावा”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

उज्ज्वल निकम विरोधात वर्षा गायकवाड

उज्ज्वल निकम यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड निवडणुकीच्या मैदानात आहेत. सध्या प्रचार जोरदार सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वर्षा गायकवाड सध्या विद्यमान आमदार असून उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध वकील आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To the government of pakistan ujjwal nikams first reaction to vijay wadettivars allegations sgk