तळोजा येथील सेक्टर २६ मध्ये सिडकोच्या वसाहत उभारणीचे बांधकाम सुरू आहे. याच बांधकाम परिसरात रविवारी पहाटे सव्वा सात वाजता पाच वर्षांची मुलगी एकटी शौचालयाला घराबाहेर पडली असताना, याच बांधकाम परिसरातील एका २४ वर्षीय तरुणाने तिच्यावर अत्याचार केला.

पीडित मुलीने या घटनेबाबत वडिलांना सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानंतर आरोपी आशोककुमार यादव याला अटक केली आहे. या घटनेनंतर तळोजा परिसरात परप्रांतीय कामगारांविषयी संताप व्यक्त करण्यात येत असून तळोजात तणावाचे वातावरण आहे.

सिडकोने तळोजा वसाहतीमध्ये हजारो घरे उभारण्याचे बांधकाम शिर्के या विकासक कंपनीला दिले आहे. याच कंपनीमधील शेकडो मजुरांनी रविवारी पीडित मुलीवर अत्याचार केलेल्या संशयित आरोपीला शिक्षा होण्यासाठी काही तासांचा बंद पाळला. तळोजातील रहिवासी मजुरांच्या उपद्रवामुळे वैतागले आहेत. तळोजातील अनेक पथदिवे बंद असल्याचा फायदा घेऊन रात्री एकटय़ा चालणाऱ्या मुलींची छेडछाडीच्या घटनांमुळे येथील मजूर व रहिवासी यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत. या घटनेनंतर कोणताही अनूचित प्रकार होऊ नये यासाठी तळोजा पोलिसांनी तळोजा वसाहतीमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक जे. एन. पार्टे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.