गायीची शिकार केल्याने दहशतीचे वातावरण; चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातील घटना

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातील नाल्यात दोन पट्टेदार वाघाने ठाण मांडले आहे. मंगळवारी वाघाने नाल्यातच एका गायीची शिकार केल्याने खळबळ उडाली आहे. वन विभाग तथा वीज केंद्र व्यवस्थापनाने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी वाघाने मुख्य रस्त्यावर येऊन लोकांना दर्शन दिल्याने बघ्यांची गर्दी झाली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन लगत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आहे. या वीज केंद्राला लागून बफरचे झुडपी जंगल आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, चितळ, सांबर, हरिण तथा इतरही वन्यजीव प्राण्यांचा वावर आहे.

बिबट व वाघाने तर अनेकदा वीज केंद्र परिसरात मुक्काम ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी येथे वाघ, वाघीण आणि तिचे दोन छावे, असे वाघाचे अख्खे कुटुंबच वास्तव्याला होते.

मात्र मंगळवारपासून येथे दोन पट्टेदार वाघांनी मुक्काम ठोकला आहे. वीज केंद्राच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नाल्यात दोन वाघ आहेत. या वाघांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास एका गायीची शिकार केली. त्यानंतर या शिकारीवर वाघ दिवसभर ताव मारत होते.

लोकांच्या निदर्शनास वाघ येताच त्याला बघण्यासाठी लोकांची गर्दी झाली. लोकांची गर्दी बघून वाघही नाल्यालगतच्या जंगलात आडोशाला गेला. परंतु सायंकाळी पुन्हा वाघ बाहेर पडला आणि शिकारीवर ताव मारत होता. रात्रीच्या वेळी तर हॉटेल ट्रायस्टार-वीज केंद्र मार्गावर वाघ आला. अनेकांनी वाघाचे दर्शन घेतले. दरम्यान, वाघाच्या वास्तव्यामुळे वीज केंद्र परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे. वीज केंद्रातील नागरिक या मार्गावर मॉर्निग वॉक किंवा सायंकाळी फिरायला येतात.

वीज केंद्र व वन विभागाने या सर्वाना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच वाघाला जंगलाकडे किंवा ताडोबाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठीही वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. वीज केंद्राची सुरक्षा व्यवस्थाही वाघावर लक्ष्य ठेवून आहे.