मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला. यात मुख्यंत्र्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनापासून ते महाविकास आघाडीतील समन्वयाविषयी सखोल भूमिका मांडली. त्याचबरोबर राज्यातील करोना नियंत्रणासाठी राज्य सरकारच्या भविष्यातील ध्येय धोरणांवरही ठाकरे यांनी भाष्य केलं. याच मुलाखती दरम्यान संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हसत हसत राऊतांनाच प्रश्न विचारला.

राज्यावर ओढवलेलं करोनाचं संकट आणि दुसरीकडे विरोधकांकडून होत असलेले राजकीय आरोप यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात आरोपप्रत्यारोपाचे शाब्दिक युद्ध बघायला मिळत आहे. राज्यातील एकूण प्रशासकीय आणि राजकीय पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

मुलाखतीत प्रश्न विचारताना संजय राऊत म्हणाले,”उद्धवजी आपले पंचप्राण शिवसेना आहे. अनेक वर्षांपासून आपण शिवसेनेचं काम करतो आहोत. आपण नेते आहात. मार्गदर्शक आहात. शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला एक वाट आखून दिली आहे. त्या वाटेवरून आपण जात आहोत. सातत्यानं आपण असं म्हणत आलो की, शत प्रतिशत शिवसेना. काही काळ आपण दोन पक्षांबरोबर होतो म्हणजे एक पक्षाबरोबर आपली युती होती. दोन पक्षांचं सरकार होतं. आज आपण तीन पक्षांबरोबर आहोत,” असं राऊत म्हणाले. राऊत यांना मध्येच थांबवत ठाकरे म्हणाले, “पण मुख्यमंत्री आहोत.”

पुढे प्रश्न विचारताना राऊत म्हणाले,”मुख्यमंत्री आहोत आणि वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना आपल्याला पसरवायची आहे. आत्मनिर्भर शिवसेना आपल्याला करायची आहे. हे आपल स्वप्न कायम आहे का? आत्मनिर्भर शिवसेना असं म्हणतोय मी,” असा प्रश्न राऊत यांनी विचारला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हसले आणि हसत हसत म्हणाले,”विरोधी पक्षाचं काम तुम्ही करताहेत की काय?,” असा प्रतिप्रश्न ठाकरे यांनीच राऊतांना केला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले,”मी कायम विरोधीपक्षात असतो, असा आरोप आहे माझ्यावर,” असं राऊत म्हणाले.