उद्धव ठाकरे यांचे टीकास्र

सोलापूर : गरीब जनतेसाठी आम्ही दहा रुपयांत जेवणाची थाळी देण्याचे वचन देत असता, त्याची खिल्ली उडवणाऱ्यांची मानसिकता त्यातून दिसून येते,अशा शब्दांत  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, शिवसेनेच्या वचननाम्यातील या मुद्दय़ावर टीका करणाऱ्या शरद पवार, अजित पवार यांचा समाचार घेतला.

विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ात बार्शी, करमाळा, मोहोळ, सांगोला आणि सोलापुरात ठाकरे यांच्या प्रचारसभा झाल्या, त्या वेळी ते बोलत होते. बार्शी येथे शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ठाकरे यांनी शरद पवार व अजित पवारांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला. सामान्य गोरगरीब जनतेसाठी अवघ्या दहा रुपयांत जेवणाची थाळी देण्याचा वचननामा आम्ही प्रसिद्ध करताच त्यावर पवारांकडून टीका सुरू झाली आहे. ज्यांनी एवढी वर्षे सत्तेत असूनही गरिबी, दुष्काळात महाराष्ट्र पिचत ठेवला. त्यांच्याकडून गरिबांच्या पोटासाठी आम्ही करत असलेल्या योजनेवर होणारी ही टीका पाहून त्यांची मानसिकता त्यातून दिसून येते. सत्तेवर आल्यानंतर आम्ही ही योजना देणार असल्याचे वचन दिले असल्यामुळे ते पाळणार आहोत. परंतु जमिनी बळकावणे आणि वादग्रस्त विधाने करणाऱ्या पवार कुटुंबीयांकडून वेगळी ती अपेक्षा काय असा उपरोधात्मक टोलाही ठाकरे यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकांचा प्रचार करताना त्यात गांभीर्य असायला हवे. त्यात निव्वळ करमणूक व्हायला नको. त्यामुळेच आपण विरोधकांवर टीका करणे टाळतो, असे म्हणत म्हणत ठाकरे यांनी शरद पवार व अजित पवारांवर हल्ला चढविला. एक तर पवार स्वत: चांगले काही करीत नाहीत आणि दुसऱ्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला तर त्यास अडथळा आणायचे काम करतात. त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास असा हा अडथळे निर्माण करण्याचा आहे.

या वेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा जलसंधारणमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी बार्शीत शिवसेनेशी यापूर्वी गद्दारी केलेल्या आणि आता भाजपमध्ये जाऊन पुन्हा बंडखोरी केलेल्या राजेंद्र राऊत यांना धडा शिकवावा, असे आवाहन केले.