सुनावणीच्या प्रक्रियेत भूमाफियांना मोकळीक; सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामे पूर्णत्वाकडे

हेमेंद्र पाटील, लोकसत्ता

बोईसर: पालघर तालुक्यातील अनेक भागात अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहे. कारवाईसाठी आलेल्या प्रकरणाची सुनावणी होत आहे. त्यात लागणाऱ्या कालावधीतील मोकळीकतेचा फायदा भूमाफिया घेत आहेत. परिणामी  सरकारी जमिनीवर अतिक्रमण करुन  करण्यात आलेली बांधकामेदेखील पूर्णत्वास येत आहेत.

गेल्या पाच वर्षांत अनेक बांधकाम उभ्या राहिलेल्या सरावली महसूल क्षेत्रात रोजच अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. एखाद्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्यावर स्थानिक अधिकाऱ्याकडून कारवाई  केली जात नाही. सुरू असलेल्या बांधकामाचे मोजमाप घेवून वरिष्ठांकडे पाठवण्यात येतात. मात्र बांधकाम पाडण्याच्या कारवाईचे आदेश पारित करण्यात येत नाहीत. गेल्या पाच वर्षांत बोईसर मंडळ अधिकारी कार्यालयाकडून अनधिकृत बांधकाम कारवाईबाबत २०० पेक्षा अधिक अहवाल सादर करण्यात आले आहेत.

पालघर तालुक्यातील सरावली येथील शासकीय जमिनींवर उभे राहिलेले अनधिकृत बांधकामावर महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर त्याचा पाठपुरावा केल्यानंतर अनधिकृत बांधकामावर कारवाई बाबत अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.  मात्र वर्ष उलटून गेले असले तरी पालघर तहसीलदाराांचे अनधिकृत बांधकामावर कारवाई बाबत आदेश आजवर निघाले नाही.

सरकारी जागेवर असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना देखील कायद्यातील पळवाटा शोधून सुनावणी घेतली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. टाळेबंदीनंतर याभागात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू झाली होती. एका बांधकामावर हातोडा मारल्यानंतर त्या ठिकाणी महिन्याभरात पुन्हा अनधिकृत बांधकाम उभे राहिले होते.  भुमाफियाना स्थानिक अधिकाऱ्यांचे भय राहिले नसल्याने सरकारी जागेवर अनधिकृत बांधकामे तेजीत उभी राहत आहेत असे सांगितले जात आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ ऑक्टोबपर्यंत रहिवास संकुलातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करू नये, असे आदेश महसूल विभागाला देण्यात आले होते. त्या अनुषंगाने ३१ ऑक्टोबपर्यंत अशा बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे महसूल विभागाने टाळले असले तरी आता डिसेंबर उजाडत आला असताना देखील कारवाईचे आदेश मात्र आले नाही.

सुनावनीनंतरच्या कारवाईची प्रतीक्षा

बोईसर अवधनगर भंगार गल्ली सरावली याठिकाणी मोठी अतिक्रमणे जोर धरू लागली आहेत त्या अनुषंगाने वारंवार केलेल्या तक्रारीनुसार मंडळ अधिकारी यांनी या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव तहसीलदार पालघर यांचेकडे पाठवला होता तहसीलदारांनी या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासंदर्भात नोटिसा पाठवून सुनावण्या घेतल्या. आता सुनावणीनंतर कोणती प्रकरणे मार्गी लागतात व कोणती अतिक्रमणे जमीनदोस्त होतात. बेकायदा अतिक्रमणांवर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पालघर तालुक्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी आलेल्या अहवालानुसार सुनावणी घेतली जात आहे. नियमानुसार सुनावणीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल.

— सुनिल शिंदे, तहसीलदार, पालघर