वावटळीसह बुधवारी मुंबई, ठाणे, रायगडसह राज्याच्या विविध भागांत पडलेल्या अवकाळी पावसाने लोकांची दाणादाण उडाली. रायगड आणि ठाणे जिल्ह्य़ात विजेचे खांब पडल्याने अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला. पावसामुळे लोणावळा, खोपोलीजवळ घाटात दरडी कोसळल्याने पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे व रस्ते वाहतूकही ठप्प झाली. पावसामुळे विजेचे खांब पडल्याने त्याचा धक्का लागून सोलापूर जिल्ह्य़ात दोघांचा मृत्यू ओढवला. कोकणातही पावसाने कहर केला असून अनेक घरांची पडझड झाली तर आंबा व अन्य पिकांचे नुकसान ओढवले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व दक्षिण कोकणात काही ठिकाणी गुरुवारीसुद्धा पावसाची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे रायगड, ठाणे जिल्ह्यात बऱ्याच भागांत विजेचे खांब पडल्याने तसेच तारांवर झाडे पडल्याने विद्युतयंत्रणा जमीनदोस्त झाली. परिणामी शहापूर, मुरबाड, कर्जत, खालापूर, महाड, अलिबाग, रोहा आदी भागांत वीजपुरवठा खंडित होऊन अंधार पसरला.
आसमंतात धूळ
ठाणे-डोंबिवली परिसरात बुधवारी दुपारी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याने आसमंतात धूळ उडवली. विशेषत: डोंबिवली शहर धुळीने झाकोळून गेले होते.  अंबरनाथ-बदलापूरमध्ये काही हलक्या सरी, तर वांगणी परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे गेले काही दिवस वाढलेल्या उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. या भागात विजेचा लपंडावही सुरू होता.
वाहतूक रखडली
खंडाळा घाटात मंकी हिल येथे पुणे-मुंबई दरम्यानच्या ओव्हर हेड वाहिन्यांवर झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक सायंकाळी काही काळासाठी ठप्प झाली होती. याशिवाय जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर लोणावळा येथे आणि द्रुतगती मर्गावर खंडाळा येथे झाड व फलक पडल्याने तेथील वाहतूकही ठप्प झाली होती. पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक सुमारे अडीच-तीन तास ठप्प झाली होती. खंडाळा येथे गाराही पडल्या.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ एक दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती. मात्र प्रशासनाने महामार्गावर कोसळलेले दगड गोटे आणि मातीचे ढिगारे तातडीने बाजूला करुन वाहतुक सुरु केली. तासभरानंतर मुंबई पुणे वाहतूक सुरळीत करण्यात आली.
कोकणात धुवांधार
कोकणच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्य़ांमध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे मोठय़ा  प्रमाणात पाणी वाहू लागले असून नारळ, सुपारी, आंब्यासह विविध प्रकारची झाडे उन्मळून पडली आहेत.
रायगड जिल्ह्य़ात महाड, पोलादपूर टापूत पावसाचा जास्त फटका जाणवला, तर रत्नागिरी जिल्ह्य़ात चिपळूण, संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी या तालुक्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी पडल्या.
पोलादपूर तालुक्यातील ९६ घरांचे अंशत: नुकसान झाले असून २ घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. तालुका प्रशासनाने वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत.    
पेण परिसरात मोठमोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. खोपोलीत सिद्धार्थ नगर येथे सहा घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. खोपोलीच्या काजूवाडी टेकडीवर असलेला दूरदर्शनचा लघुप्रक्षेपण मनोरा उच्चदाबाच्या वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने मोठा आवाज होऊन उन्मळून पडला. त्यामुळे या भागात घबराट पसरली होती.