शहरीकरणाला संकट मानल्यामुळे नियोजन केले गेले नाही आणि त्यामुळेच सध्या अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, आपल्याला शहरीकरण संकट वाटत नसून, ती एक संधी आहे. त्यामुळे यापुढे शहरीकरणाकडे आपण विशेष लक्ष देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नागपूरमध्ये सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नागपूर मेट्रो रेल्वेचे आणि पारडी उड्डाणपूलाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वैंकय्या नायडू, पियूष गोयल, राज्यपाल के. शंकरनारायणन आदी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, आपल्याकडे शहरीकरणाला संकट मानले गेले. त्यामुळे कोणतेच नियोजन केले गेले नाही. त्यामुळे शहरे फोफावत गेली आणि सुविधा कमी पडत गेल्या. जर वेळीच नियोजन केले असते, तर आज ही वेळ आली नसती. शहरीकरण ही एक संधी आहे. आर्थिक विकासाच्या संधीचे केंद्रबिंदू आहे. त्यामुळे पुढील काळात आपण शहरीकरणाकडे संधी म्हणून बघून विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करू.
गेल्या काळात देशाला केवळ राजकारण्यांनी लुटले हा गैरसमज आहे. वास्तविक ज्याला संधी मिळाली, त्या प्रत्येकानेच लुटले असल्याचे स्पष्ट करीत भ्रष्टाचाराचा सर्वाधिक त्रास मध्यमवर्गालाच झाला असल्याचे मोदी म्हणाले. शहरातील गरिबांना कौशल्य विकासाची संधी मिळवून देण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी सांगितले.
जग फार वेगाने बदलत असल्याचे सांगून ते म्हणाले, भारतानंतर जे देश स्वतंत्र झाले ते आपल्यापेक्षा पुढे निघून गेले आहेत. आम्ही मागे का राहिलो, याचा विचार केला पाहिजे. आपण मागे राहिलो, याबद्दल आपल्याला खंत वाटत नसेल, देशाला पुढे घेऊन जाण्याचा उद्देश नसेल तर देश पुढे जाऊ शकत नाही. आम्ही देशाला बदलणार हे प्रत्येकानेच ठरविले पाहिजे, असेही मोदी यांनी सांगितले.