scorecardresearch

खाद्यतेल भडकल्याने वडापाव महागला

रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युध्दामुळे खाद्यतेल, मैदाचे दर वाढल्याने गरिबाची पोटपूजा करण्यात महत्त्वाचा भाग ठरलेल्या वडापावचे दर दीड पटीने वाढले असून वडय़ाचा आकारही आकसला आहे.

दिगंबर शिंदे

सांगली : रशिया-युक्रेन यांच्यात सुरू  असलेल्या युध्दामुळे खाद्यतेल, मैदाचे दर वाढल्याने गरिबाची पोटपूजा करण्यात महत्त्वाचा भाग ठरलेल्या वडापावचे दर दीड पटीने वाढले असून वडय़ाचा आकारही आकसला आहे. बाजारात गेल्या पंधरा दिवसांत खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. पामतेलाचा किलोचा दर १५० रुपयांवर पोहोचला असून अन्य तेलाचे दर १८० रुपयांपर्यंत गेले आहेत. तशातच गव्हाला निर्यातीची मोठी संधी निर्माण झाल्याने बाजारात गहू व्यापाऱ्यांनी साठेबाजी सुरू केल्याने गव्हाच्या दरातही किलोमागे दोन ते चार रुपये दरवाढ केली आहे.

गव्हाचे दर वाढल्याने बेकरी पदार्थाच्या दरातही २५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून ही दरवाढ १८ मार्चपासून लागू करण्यात आली. याचबरोबर बाजारात हिरव्या मिरचीचे दरही १२० रूपये किलोवर पोहोचले आहेत. तसेच बेसनचा दरही ८० रुपये किलोवर पोहोचला आहे. एकूणच तेल, पाव, हिरवी मिरची, बेसन यांची भाववाढ झाल्याने वडापावची दरवाढ अपरिहार्य असल्याचे सांगलीतील प्रसिद्ध वडापाव गाडी चालक मुबारक पटेल यांनी सांगितले.

सांगलीत गेल्या आठवडय़ापर्यंत वडापावचा दर सात रुपये होता. तो आता दहा रुपये करण्यात आला असून हिरव्या मिरचीचे दर वाढल्याने एका वडापावसोबत एकच तळलेली मिरची मिळेल असे सांगण्यात येत आहे. इतर शहरातही असाच दहा-बारा रुपयांच्या आसपास मिळणाऱ्या वडापावच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. या महागाईमुळे भाववाढीबरोबरच वडा आणि पावाचे आकारमानही कमी झाले आहे. एकूणच गरिबापासून ते श्रीमंतार्पतत अनेकांची भूक आणि चव भागवणाऱ्या पदार्थाला आता सर्वानाच थोडे जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vadapav expensive due to the outbreak edible oil russia ukraine because war edible oil prices rose ysh

ताज्या बातम्या