अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही दावा करण्यात येत होता. विधानसभेत ज्याचे सर्वाधिक सदस्य त्याचा विरोधी पक्षनेता असं सूत्र आहे. त्यानुसार, महाविकास आघाडीत आता सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असल्याने विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला देण्यात आले आहे. विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेता असतील असा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

याबाबत काँग्रेसकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

राज्याचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या आधीच राज्यात राजकीय भूकंप झाला. राज्याच्या विरोधी बाकावर असलेले अजित पवार थेट सत्तेत जाऊन सहभागी झाले. एवढंच नव्हे तर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याचे विरोधी पक्षनेतेच सत्तेत सहभागी झाल्याने हे पद रिक्त झाले होते. अजित पवारांसह काही आमदारांनीही सरकारला पाठिंबा दर्शवल्याने विधानसभेत राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाले. परिणामी रिक्त जागेवर राष्ट्रवादी दावा करू शकली नाही. महाविकास आघाडीत आता काँग्रेसकडे सर्वाधिक विधिमंडळ सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेसकडे हे पद गेले आहे.

पावसाळी अधिवेशन या आठवड्यात संपणार आहे. आधीचे दोन आठवडे विरोधी पक्षनेत्याशिवाय हे अधिवेशन पार पडले. त्यामुळे अखेरच्या तीन दिवसांत विरोधी पक्षनेते किती आक्रमक होतात हे पाहावं लागणार आहे.