येथील श्री विठ्ठल-रुख्मिणीमातेचे मुखदर्शन पहाटे ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे. दररोज एक हजार भाविकांना दर्शन देणार असून फक्त ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या भाविकांना दर्शन घेता येणार आहे. तसेच  मुखपट्टी,योग्य अंतर, सॅनिटायझरचा वापर आदी नियम बंधनकारक असल्याची माहिती श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महारज औसेकर यांनी दिली.

राज्यातील सर्व मंदिरे आजपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करण्याबाबत बैठक झाली. या नंतर या बैठकीतील निर्णय मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आणि सह अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.

या शिवाय ६५ वर्षांपुढील,१० वर्षांखाली आणि गर्भवतींना मंदिरात दर्शनासाठी परवानगी नाही.  सकाळी ६ ते ७, ८ ते ९,१० ते ११,११ ते १२, दुपारी १२ ते १,२ ते ३,३ ते ४, संध्याकाळी ५ ते ६,७ ते ८ आणि ८ ते ९ या कालावधीत भाविकांना दर्शन घेता येईल अशी माहिती जोशी यांनी दिली आहे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

* दररोज सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शनास परवानगी दिली आहे. तसेच सर्व भाविकांनी दर्शनासाठी http://www.vitthalrukminimandir.org  या संकेतस्थळावर जाऊन दर्शनाची वेळ निश्चित करावी लागणार आहे.

* ज्या भाविकांनी अशा पद्धतीचे दर्शन बुकिंग केले त्यांनाच दर्शनासाठी परवानगी दिली जाणार आहे. तसेच येणाऱ्या भाविकांनी ओळखपत्र आणणे गरजेचे आहे.

* एखाद्या भाविकाला ताप,सर्दी खोकला आदी लक्षणे दिसून आली तर त्या भाविकाला दर्शनास सोडण्यात येणार नाही.