जिल्ह्यातल्या ८ क दर्जाच्या व एका ब दर्जाच्या शहराचे कारभारी कोण होणार याचा फैसला उद्या मतदानयंत्रात बंद होणार आहे. शिवाय दोन नगरपंचायतींची धुरा कुणाच्या खांद्यावर जाते, याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राज्यात भाजपची घोडदौड सुरू असली तरी नांदेड जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. काही नगरपालिकांचे निकाल धक्कादायक लागण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील ९ नगरपालिका व दोन नगरपंचायतीसाठी रविवारी मतदान होणार आहे. तब्बल २ लाख ५हजार ५ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. एकुण २८३ मतदान केंद्र असून त्यापकी १६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. ९ नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी ५३ उमेदवार आहेत तर नगरपंचायतीकरीता २ व नगरसेवक पदासाठी ७९३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी एक मुख्य निवडणूक निरीक्षक, चार निवडणूक निरीक्षक यासह अनेक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान तब्बल ३४० गुन्हे दाखल झाले. त्यात २२० जणांना अटक करण्यात आली. शिवाय ८ हजार ६५७ लिटर दारु व ८ हजार ६६६ लिटर ताडी जप्त करण्यात आली. आचारसंहितेअंतर्गत वेगवेगळ्या पथकाने सुमारे २४ लाख १७ हजार रुपयाची अवैध रक्कम जप्त करण्यात आली आहे. आज रात्री प्रचाराची मुदत संपणार असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मतदारांशी थेट संपर्क साधण्यात धन्यता मानली.

जिल्ह्यातील हदगाव, देगलूर, बिलोली या ठिकाणच्या निवडणुका चुरशीच्या होत आहेत. या पाश्र्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीवप्रसाद यांनी शुक्रवारी एक बठक घेतली. सुरक्षिततेसाठी अन्य जिल्ह्यातील पोलीस अधिकारी बोलावण्यात आले आहेत. सकाळी मतदानाला प्रारंभ होणार आहे. देगलूर, धर्माबाद, बिलोली, कुंडलवाडी, उमरी, मुखेड, कंधार, हदगाव व मुदखेड या नऊ नगरपालिकांसह माहूर व अर्धापूर या नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. राज्यात लागलेले निवडणुकांचे निकाल, नांदेड जिल्ह्यात कॉंग्रेसकडे असलेले प्रदेशाध्यक्षपद या सर्व पाश्र्वभूमीवर निकालाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.